VIDEO : अपंगत्व झुगारणाऱ्या "त्या" चिमुकलीचं वक्तृत्व ठरलं लक्षवेधी

VIDEO : अपंगत्व झुगारणाऱ्या "त्या" चिमुकलीचं वक्तृत्व ठरलं लक्षवेधी

कोल्हार | वार्ताहर

शरीराने अपंग मात्र मनाने तितकीच कणखर... जीवन परावलंबी मात्र आत्मविश्वास स्वावलंबनाचा... होय! एका चिमुकल्या शालेय मुलीने कोल्हार येथील वक्तृत्व स्पर्धेत सहभागी नोदवीत उपस्थितांची मने जिंकली. आणि तिची प्रबळ इच्छाशक्ती लक्षवेधी ठरली...

कोल्हार बुद्रुक येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी माधवराव खर्डे पाटील स्मृती जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली. स्पर्धेचे यंदाचे ३९ वे वर्ष आहे. स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील विविध विद्यालयातून विद्यार्थी विशेषतः विद्यार्थिनींनी उस्फूर्त सहभाग नोंदविला. सर्व स्पर्धकांनी एका वरचढ एक अशी भाषणे केली. मात्र लक्षवेधी ठरली ती कु. मैत्रेयी विनोद मेहेर.

राहुरी येथील श्री छत्रपती शिवाजी विद्या मंदिरातील इयत्ता पाचवीमध्ये शिकणारी कु. मैत्रेयी विनोद मेहेर हिने या स्पर्धेत सहभाग नोंदविला. पूर्णतः परावलंबी असलेल्या कु. मैत्रेयी हिला स्पर्धेदरम्यान उचलून व्यासपीठासमोर आणावे लागले. तिच्यासोबत तिचे आईवडिल, वर्गशिक्षक होते. पायावर उभे राहता येत नाही म्हणून तिला खुर्चीवर बसविण्यात आले. शरीराने विकलांग असलेली कु.मैत्रेयी मनाने आणि वक्तृत्वाने कोठेही खचलेली दिसली नाही. तिच्यामध्ये अपंगत्वाचा कोणताही न्यूनगंड नव्हता. "वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे" या विषयावर तिने अगदी ओघवत्या शब्दात प्रभावीपणे आपले मनोगत मांडले.

ती या स्पर्धेत यशस्वी ठरेल अथवा नाही माहीत नाही. तिला पारितोषिक मिळेल अथवा नाही हे माहीत नाही. परंतु कोणताही न्यूनगंड न बाळगता धाडसाने लोकांसमोर येऊन वकृत्व गुण जगासमोर मांडण्याचं धारिष्ट तिने दाखवलं. तिचा आत्मविश्वास यातून झळकला. दृढता आणि कणखरतेचा अविष्कार तिच्या बोलण्यातून पाझरला. ही शिकवण उपस्थित अनेकांसाठी स्फूर्तीदायक ठरली...

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com