संगमनेर | प्रतिनिधी

दोन वर्षात निळवंडे धरणाचे सर्व काम पूर्ण करू, अशी ग्वाही जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली.

स्वतंत्रसेनानी भाऊसाहेब थोरात व हरित क्रांतीचे प्रणेते डॉ.अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवानिमित्त आयोजित प्रेरणदिन पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते.

निळवंडे धरण जवळपास पूर्ण झाले आहे. 2024 दरम्यान निळवंडे धरणाचे उर्वरीत सर्व कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल. जलसंपदा खात्याने काही धोरणं हाती घेतली आहेत. स्व. भाऊसाहेब थोरात हे नेहमीच पाण्याबाबत आग्रही राहिले. सर्वात जास्त पाण्याची गरज नगर जिल्ह्याला आहे. निळवंडे धरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर येथील शेती क्षेत्राची गती वाढणार आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले.

ना. जयंत पाटील म्हणाले, नाशिक-नगर जिल्ह्यातील वळण बंधार्याचे कामांना गती देण्याचे काम प्रामुख्याने हाती घेण्यात आले आहे. हे सर्व पाणी गोदावरी खोर्यात येणार आहे. त्यामुळे पाण्याची टंचाई दुर होणार आहे. जलसंपदा खात्याने विविध योजना आखल्या आहेत. या सर्व योजनांना हात घातलेला आहे. गोेदावरी खोर्यात नदीचे पाणी आले पाहिजे म्हणून नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कामे सुरु झालेले आहे. त्यामुळे यापुढील काळात मोठ्या प्रमाणावर पाण्याची उपल्बधता होईल, अशी मला खात्री आहे. निळवंडे धरणाबाबत स्व. भाऊसाहेब थोरात यांनी ज्या पद्धतीचे धोरण घेतले त्याच पद्धतीचे धोरण बाळासाहेब थोरात यांनी घेतले आहे, असेही ते म्हणाले.

संगमनेर येथे स्वातंत्र्य सैनिक सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात, हरित क्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती निमित्त आयोति कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, उद्योगपती राजेश मालपाणी, युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे, आमदार लहु कानडे, ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे, ग्लोबल टिचर पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसले, महानंदाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख, बाजीराव पा. खेमनर, माधवराव कानवडे, आमदार डॉ. किरण लहामटे, लक्ष्मण कुटे, राजीव शिंदे, उत्कर्षा रुपवते, करण ससाणे, दुर्गाताई तांबे, बाबा ओहोळ आदि मान्यवर उपस्थित होते.