<p><strong>चांदा l वार्ताहर </strong></p><p>नेवासा तालुक्यातील चांदाजवळील रस्तापुर शिवारात वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात काल रात्री एक बिबटया अडकला आहे. मात्र अजूनही या परिसरात दोन बिबटे असल्याचे परिसरातील शेतकऱ्यांनी सांगितल्याने या परिसरात भिती कायम आहे.</p>.<p>याबाबत सविस्तर माहिती अशी की, अमृत बन्सीलाल मुथ्था यांच्या गट नं ३१५मध्ये बांबू शेताकडेला गेल्या सोमवारी वन विभागाने या परिसरातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पिंजरा लावला होता. या परिसरात दोन ते तीन बिबटयांचा सतत वावर असल्याचे तेथील शेतकऱ्यांचे म्हणणे होते. या ठिकाणी लावलेल्या पिंजऱ्यात बिबटयाला भक्ष म्हणून एक शेळी ठेवण्यात आली होती. काल गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास भक्षाच्या शोधार्थ या ठिकाणी आलेला बिबट्या अलगत पिंजऱ्यात अडकला. अहमदनर वनक्षेत्र अधिकारी सुनिल थेटे यांच्या मार्गदर्शनाखाली डि .के. पातारे यांच्या सुचनेनुसार नेवासा वन विभागाचे एमआय सध्यद, डी टी . गाडे, सी .ई .ढेरे याच्या पथकाने योग्य नियोजन करत जेरबंद बिबट्याला तेथून तातडीने हलविले. बिबट्याला पाहण्यासाठी सकाळी तोबा गर्दी झाली होती. अनेकांनी मोबाईल कॅमेऱ्यात बिबटयाला टिपले. तसेच या ठिकाणीच पून्हा पिंजरा लावावा अशी मागणी या वेळी तेथे उपस्थित असणाऱ्या युवक शेतकऱ्यांनी केली आहे.</p>