व्हर्टिकल गार्डनमुळे संगमनेरच्या वैभवात भर

व्हर्टिकल गार्डनमुळे संगमनेरच्या वैभवात भर

संगमनेर |प्रतिनिधी| Sangmner

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली

काम करणार्‍या संगमनेर नगर परिषदेने नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली हरित शहर म्हणून आपली ओळख निर्माण केली असून आता नव्याने उभारलेल्या अनोख्या व्हर्टीकल गार्डनमुळे शहराच्या वैभवात आणखी भर पडली आहे.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतील स्वच्छ संगमनेर, सुंदर संगमनेर, हरित संगमनेर या संकल्पनेतून नगरपालिकेने सातत्याने विविध उपक्रम राबवले आहेत. महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा होत असून विविध विकास कामांबरोबर हायटेक बस स्थानक, वैभवशाली इमारती, शैक्षणिक व सांस्कृतिक वारसा यामुळे संगमनेर शहर राज्यात अग्रगण्य म्हणून ओळखले जात आहे.

नगरपालिकेने सातत्याने नागरिकांना चांगल्या सुविधा देताना रस्ते, नव्याने 25 गार्डन यांची केलेली निर्मिती, भूमिगत गटारी याचबरोबर प्रवरा नदीकाठी असलेल्या घाटांचे सुशोभीकरण अशी विविध कामे केली आहेत.

या गार्डनबरोबरच संगमनेर नगरपरिषदेच्यावतीने संगमनेर बसस्थानकासमोर नवीन नगर रोड तसेच नामदार बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानाकडे जाणार्‍या सह्याद्री विद्यालयासमोर रोडवर अशा विविध ठिकाणी उभारलेले व्हर्टिकल गार्डन हे सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरत आहेत.

‘आय लव माय संगमनेर’ या टॅगखाली उभारण्यात आलेले हे गार्डन तरुणांचे सेल्फीचे ठिकाण ठरत आहे. या गार्डनमध्ये विविध फुलांचे रोपण करण्यात आले असून यामुळे कमी जागेत जास्तीत जास्त फुलांचे रोपण होत असल्याने हा परिसर हिरवा होत आहे. नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे यांनी हा अनोखा उपक्रम राबवला असून या उपक्रमामुळे शहराच्या हरित संकल्पनेत आणखी भर पडली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com