शेतकर्‍यांनी गांडुळ खत निर्मिती प्रकल्प उभारावेत - मुरकुटे

टाकळीभान येथे लोकसेवा विकास आघाडीचा मेळावा
शेतकर्‍यांनी गांडुळ खत निर्मिती प्रकल्प उभारावेत - मुरकुटे

टाकळीभान |प्रतिनिधी| Takalibhan

भविष्यात शेतकर्‍यांनी गांडुळ खत प्रकल्प सुरु करावेत. आगामी काळात साखर कारखान्यांना ऊस तोडणी मजुरांचा तुटवडा भासणार असल्याने ऊस तोडणी यंत्रांची मागणी वाढली आहे. जिल्हा बँकेच्या माध्यमातून यंत्र खरेदीसाठी कर्ज पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा बँकेचे संचालक माजी आ. भानुदास मुरकुटे यांनी टाकळीभान येथे आयोजित लोकसेवा विकास आघाडीच्या मेळाव्यात बोलताना केले. यावेळी विखे समर्थक माजी सभापती नानासाहेब पवार यांचे बंधू शंकरराव पवार व त्यांचे सुपुत्र ग्रा. पं. सदस्य दिपक पवार यांनी मुरकुटे गटात प्रवेश केला.

मुरकुटे पुढे म्हणाले की, रासायनिक खतांच्या किंमती दिवसेंदिवस वाढत असल्याने शेती उत्पादन खर्चात मोठी वाढ होत आहे. उत्पादन खर्च कमी करणे गरजेचे असून शेतकर्‍यांनी गांडुळ खत निर्मिती प्रकल्प सुरु करावेत. आगामी काळात उसतोडणी मजुरांची टंचाई जाणवणार असून शेतकर्‍यांनी ऊस तोडणी मशीनद्वारे ऊस तोडणी करावी लागणार आहे. जिल्हा सहकारी बँक मशिन खरेदीसाठी लागणार्‍या रकमेच्या 70 टक्के रक्कम कर्जरूपी देणार आहे. शेतकर्‍यांनी मशिन खरेदी केल्यास अशोक कारखान्याच्यावतीने यंत्र चालविण्याचे प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यंदा पाऊस मोठ्या प्रमाणात पडू शकतो, परिणामी सर्व शेतकरी बांधवांनी खरीप पिकांचे विमे उतरवून घ्यावेत, असे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी आगामी निवडणुकांबाबत रणनिती आखण्यासाठी प्रमुख कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली. आगामी निवडणुकीतील युतीबाबत येत्या काही दिवसात निर्णय घेतला जाईल, असे सांगुन आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे त्यांनी संपर्क साधुन मंत्रिमंडळातील प्रवेशाबाबत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी टाकळीभान लोकसेवा विकास आघाडीच्या उपाध्यक्षपदी रावसाहेब वाघुले यांची तर युवा आघाडीच्या अध्यक्षपदी मल्हार रणनवरे यांच्या नियुक्तीची घोषणा मुरकुटे यांनी केली.

मेळाव्यास अशोकचे व्हा. चेअरमन भाऊसाहेब कहांडळ, माजी चेअरमन ज्ञानदेव साळूंके, माजी संचालक भाऊपाटील थोरात, शेतकरी संघटनेचे सुभाष पटारे, संचालक यशवंत रणनवरे, शिवाजीराजे शिंदे, माजी उपसरपंच पाराजी पटारे, शंकरराव पवार, दिपक पवार, दत्तात्रय नाईक, ग्रा. पं. सदस्य मयूर पटारे, सुनिल बोडखे, शिवाजी पवार, मल्हार रणनवरे, भाऊसाहेब पटारे, धनराज कोकणे, मच्छिंद्र कोकणे, संदीप कोकणे, भाऊसाहेब कोकणे, भास्करराव कोकणे, रावसाहेब वाघुले, आबासाहेब आहेर, बाळासाहेब आहेर, बबलू वाघुले, भागवत रणनवरे, सुभाष येवले, पोपट जाधव, अशोक तुवर, रंगनाथ कोकणे, विजू शिंदे, दादासाहेब कापसे, तुकाराम बोडखे, बाळासाहेब जगताप, संजय पटारे आदी उपस्थित होते.

एकाच कामाचे दोन वेळा उद्घाटन

टाकळीभान ग्रामपंचायतीतील कुरघोडीच्या राजकारणामुळे विकास कामाचा डबल नारळ फुटला आहे. मेळाव्यानिमित्त माजी आ.मुरकुटे यांच्या हस्ते विकास कामांचा शुभारंम व लोकार्पणाचा कार्यक्रम सरपंच गटाच्यावतीने आयोजित करण्यात आला होता. मात्र उपसरपंच गटाकडून ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत मेळाव्याच्या आदल्या दिवशीच उद्घाटन व लोकार्पण सोहळा पार पाडण्यात आल्याने एकाच कार्यक्रमाचा डबल नारळ फुटल्याची ग्रामस्थांमध्ये चर्चा सुरु होती.

गेल्या काही दिवसात माजी आ. मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली जलजीवन मिशन अंतर्गत 1.5 कोटी आणि घनकचरा व्यवस्थापनासाठी जवळपास 90 लाख रूपयांचा निधी मिळाला असून लवकरच या कामाचा उदघाटन सोहळा श्री. मुरकुटे यांच्या हस्ते केला जाईल. असे ग्रा. पं. सदस्य मयुर पटारे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com