जनावरांच्या डॉक्टरांकडून लसीकरणासह ऑनलाईन काम बंद

पशुचिकित्सा व्यवसायी संघटना : तिसर्‍या टप्प्यात संपूर्ण काम बंदचा इशारा
जनावरांच्या डॉक्टरांकडून लसीकरणासह ऑनलाईन काम बंद
File Photo

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेच्यावतीने (जनावरांचे पद्वीका डॉक्टर) यांच्या विविध मागण्यासाठी आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. याची दखल पूशसंवर्धन आयुक्त यांनी न घेतल्याने जनावरांच्या डॉक्टरांकडून मंगळवारपासून आंदोलन सुरू करण्यात आले आहे. यात पहिल्या टप्यात जनावरांचे लसीकरण सेवा आणि ऑनलाइन मासिक व वार्षिक अहवाल देणे बंद त्यासोबत कोणत्याही आढावा बैठकांना या संवर्गातील सदस्य उपस्थित राहणार नाहीत. तसेच सर्व शासकीय व्हाट्सअप ग्रुपमधून बाहेर पडणार असल्याची माहिती संघटनेच्यावतीने देण्यात आली.

या आंदोलनाच्या दुसर्‍या टप्यात 25 जूनपासुन राज्यातील विधानसभा व विधानपरिषद सदस्य याना निवेदने देऊन मागण्यांकडे लक्ष वेधण्यात येणार असून तिसर्‍या टप्यात 16 जुलैपासून मागण्याची दखल न घेतल्यास पूर्णपणे काम बंद आंदोलन करण्याचा इशारा पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने दिला आहे. पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने आस्थापना सेवा, व्यावसायिक व आर्थिक विषयीच्या प्रदीर्घ काळापासुन प्रलंबित मागण्याबाबत मे महिन्यांत पशूसंवर्धन विभागाला कळविले होते.

यात सहायक आयुक्त पशुसंवर्धन, पशुधन विकास अधिकारी गट अ सेवाप्रवेश नियमात सुधारणा करणे, पशुधन विकास अधिकारी (विस्तार) गट ‘अ’ पंचायत समिती या पदनामात बदल करून तालुका पशुसंवर्धन अधिकारी गट ‘अ’ पंचायत समिती हे करू नये, पशुधन पर्यवेक्षक संवर्गातील कर्मचार्‍यांना देण्यात आलेल्या तिसर्‍या कालबद्ध पदोन्नतीच्या वेतन निश्चितीत सुधारणा करावी, ग्रामसेवक व कृषी सहायक यांच्या धर्तीवर संवर्गातील कर्मचार्‍यांना दरमहा वेतनातून कायम प्रवासभत्ता मंजूर करावा, पदविका प्रमाणपत्र धारकांची अर्हता भारतीय पशुवैद्यक परिषद कायदा 1984 च्या पहिल्या अनुसूचित समाविष्ट करून शासन अधिसूचना 27 आगस्ट 2009 रद्द करून सुधारित अधिसूचना काढावी, यासह अन्य मागण्याचा समावेश होता.

हे प्रश्न सोडविण्यासाठी आयुक पशुसंवर्धन यांनी संघटेनला चर्चेसाठी बोलविणे अपेक्षित होते. मात्र, त्यांच्याकडून कोणतीच दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे संघटनेने 9 जूनला आयुक्ताची त्याच्या दालनात भेट घेतली. यावेळी दोनच मागण्यांवर अर्धवट चर्चा करून बैठक संपविण्यात आली. यामुळे संघटनेचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर सोनावळे, सचिव डॉ. नितीन निर्मळ, राज्य संघटनेचे कार्याध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर गांगर्डे, डॉ. गंगाधर निमसे, डॉ. संजय कढणे, डॉ. बाळासाहेब वाघचौरे, डॉ. सुधाकर लांडे, डॉ. दत्तात्रय जठार, डॉ. संतोष सांळूखे, डॉ. उमेश पंडुरे, डॉ. दिनेश क्षिरसागर यांच्यासह जिल्ह्यातील जनावरांच्या डॉक्टरांनी आंदोलनाला सुरूवात केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com