ना.थोरात राष्ट्रवादीच्या नेत्याला म्हणाले, ‘तुझं जितकं वय आहे, तितकं माझं राजकारण आहे... ऐकून घेतो म्हणजे...’

करोना आढावा बैठकीत एकच गोंधळ
ना.थोरात राष्ट्रवादीच्या नेत्याला म्हणाले, ‘तुझं जितकं वय आहे, तितकं माझं राजकारण आहे... ऐकून घेतो म्हणजे...’
ना. थोरात

अकोले -

करोना रुग्णांवर उपचारासाठी वापरल्या जाणार्‍या रेमडेसिवीर इंजेक्शनच्या तुटवड्यावरून एका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याने करोना आढावा बैठकीत चांगलाच गोंधळ घातल्याने महसूलमंत्री बाळासाहेब थोरात संतप्त झाले. त्यांनी गोंधळ घालणार्‍या कार्यकर्त्याला चांगलेच सुनावले.

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात रविवारी (18 एप्रिल) झालेल्या करोना आढावा बैठकीदरम्यान हा प्रकार घडला.

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात नागरिकांचे प्रश्‍न ऐकून घेत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रवि मालुंजकर यांनी मोठ्या आवाजात प्रश्‍न विचारण्यास सुरुवात केली. रेमडेसिवीरच्या तुटवड्यावरून बैठकीत आक्रमक भूमिका घेत चांगलाच गोंधळ घातला. रेमडेसिवीर इंजेक्शनसंदर्भात प्रश्‍नांची सरबत्ती केली.

अकोले तालुक्याची करोनामुळे बिकट अवस्था झाली असताना नीट आरोग्य सुविधा पुरवल्या जात नाही, असे सांगत आरोग्य विषयक तक्रारीचा पाढाच रवि मालुंजकर यांनी वाचला. त्यामुळे बैठकीत एकच गोंधळ उडाला. बैठकीतील इतर कार्यकर्त्यांनी मालुंजकर यांना खाली बसण्यास सांगितले. पण, तरीही मालुंजकर प्रश्‍न विचारताच होते.

त्यांनतर मंत्री थोरात यांनी देखील या कार्यकर्त्याला चांगलेच सुनावले. तुझं जितकं वय आहे तितकं माझं राजकारण आहे. तुम्हाला संवेदना आहेत आणि आम्हाला नाहीत का? असा प्रश्‍नही थोरातांनी त्याला विचारला. आम्ही ऐकून घेतो म्हणजे काहीही बोलायचे असे नाही, असेही मंत्री थोरात यांनी सुनावले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com