
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
वाहन चालकाने अपघाताचा बनाव करून 30 लाखांचा लसूण विक्री करून तालुक्यातील खानापूर येथे लपविला. त्याच्यावर स्थानिक गुन्हे शाखेकडून कारवाई करत तीन आरोपींसह मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
समद सिद्दीकी तुंबी (वय 38, धंदा व्यापार, रा. पोस्ट ऑफिस समोर, ता. दोरांजी, जिल्हा राजकोट, राज्य गुजरात) यांची लसूण, कांदा व इतर माल खरेदी विक्रीची एस. एस. ट्रेडींग नावाची कंपनी आहे. त्यांनी सिध्दीकी ब्रदर्स गुजरात यांच्याकडून 22 हजार 160 किलो वजनाचा 29 लाख 91 हजार 600 रुपये किंमतीचा लसूण खरेदी करून तो निमज मध्यप्रदेश येथून बैंगलोर याठिकाणी मोदी रोड लाईन्स ट्रान्सपोर्ट कंपनी मार्फत ट्रक क्र. आरजे-09 जीबी 2918 मध्ये पाठविला होता. सदर ट्रक वरील चालकाने अहमदनगर जिल्ह्यातील साकत शिवारात ट्रकला अपघात झाल्याचा बनाव करून ट्रक मधील लसूण मध्यस्थी मार्फत परस्पर विक्री केला होता. याबाबत अपहाराचा गुन्हा पोलिसांत दाखल झाला होता.
पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, सहायक फौजदार भाऊसाहेब काळे, पोहेकॉ मनोहर गोसावी, देवेंद्र शेलार, रविंद्र कर्डीले, सचिन आडबल, संतोष खैरे, फुरकान शेख, रणजीत जाधव, शिवाजी ढाकणे, अमृत आढाव व मेघराज कोल्हे आदींच्या पथकाने ट्रकवरील चालक सन्वरलाल जाट (वय 28), रविकांत काळुराम सेन (वय 37, रा. दोन्ही रा. छपरी, ता. भिलवाडा, राजस्थान) यांना बाभळेश्वर येथून ताब्यात घेतले. सन्वरलाल याने साथीदार रविकांत सेन याच्या मध्यस्थीने रामदास तुकाराम बोलकर, रा. श्रीरामपूर यास लसूण विक्री केला असून, सदर माल हा त्याचे खानापूर शिवारातील पत्र्याच्या गोडावूनमध्ये ठेवलेला आहे, अशी माहिती दिल्याने पथकाने खानापूर, ता.श्रीरामपूर या ठिकाणी जाऊन मुद्देमाल ताब्यात घेतला.