दर कमी झाल्याने सर्वसामान्यांना भाजीपाला आवाक्यात

दर कमी झाल्याने सर्वसामान्यांना भाजीपाला आवाक्यात

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

गेल्या काही महिन्यापासून वाढलेले भाजीपाल्याचे दर कमी झाल्याने आता भाजीपाला खरेदी करणे सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले आहे. काल शुक्रवारी श्रीरामपूरच्या आठवडे बाजारात भाजीपाला स्वस्त झाला होता. त्यामुळे बाजारकरू ग्राहकांनी समाधान व्यक्त केले.

काही महिन्यापासून भाजीपाल्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले होते. त्यामुळे पालेभाज्या खरेदी करणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले होते. मेथी 40 ते 50 व कोथिंबीर 30 ते 35 रुपये जुडी, वांगी 80 रुपये, गवार, टोमॅटो 80 रुपये किलो असे भाव होते. सप्टेबर, ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी झाल्याने अनेक शेतकर्‍यांचा खरीपातील पिंकासह भाजीपाल्याचे नुकसान झाले होते. त्यामुळे भाजीपाला महागला होता.

गेल्या दोन आठवड्यापासून परतीचा पाऊस थांबला. त्यामुळे भाजीपाल्याची बाजारात पुन्हा मोठ्या प्रमाणात आवक वाढली. बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमधे वाढलेल्या आवकीमुळे भाजीपाल्याचे दर कोसळले. त्यामुळे किरकोळ बाजारातही भाजीपाला स्वस्त झाला.

काल श्रीरामपूरच्या आठवडे बाजारात मेथी 20 ते 25 रुपये, कोथिंबीर 20 रुपयात 3 जुड्या तसेच वांगी 40 रुपये, गवार, टोमॅटो 60 रुपये किलो असे भाव पहायला मिळाले. या भावामुळे सामान्य ग्राहक समाधानी झाला असला तरी शेतकर्‍यात मात्र भाजीपाल्याला कमी भाव मिळत असल्याने चिंता सतावत आहे.

खरीप हंगामात सोयाबिन, बाजरी, मका, कपाशी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पंचनामे होऊनही अद्यापी नुकसान भरपाई अथवा अनुदान मिळालेले नाही. शेतकरी रब्बी हंगामाच्या तयारीला लागला असला तरी त्याला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यात भाजीपाल्याचे दर कोसळल्याने बळीराजा दुहेरी संकटात सापडला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com