चाळीस लाख खर्चूनही भाजीविक्रेते रस्त्यावरच; तिसगावमधील परिस्थिती

चाळीस लाख खर्चूनही भाजीविक्रेते रस्त्यावरच; तिसगावमधील परिस्थिती

तिसगाव |प्रतिनिधी| Tisgav

पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे आठवडे बाजाराच्या दिवशी येणार्‍या भाजी विक्रेत्यांची सुरक्षित बसण्याची व्यवस्था व्हावी व कोणीही महामार्ग लगत

रस्त्यावर बसू नये वाहतुकीला अडथळा होऊ नये, म्हणून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुमारे 40 लाख रुपये खर्च करून पेव्हींगब्लॉकसह काँक्रिट ओटे बांधण्यात आले. मात्र, तरी देखील या ओट्यावर भाजीविक्रेते न बसता बहुतांश व्यापारी महामार्गावर रस्त्याच्याकडेला बसून, उभे राहून भाजी विक्री व्यापार करत असल्याने ग्रामपंचायतीने खर्च केलेले 40 लाख रुपये पाण्यात गेले की काय असे म्हणण्याची वेळ आता आली आहे.

कल्याण-विशाखापट्टणम हा राष्ट्रीय महामार्ग नगर-पाथर्डी मार्गे जात असून या मार्गावरून ये-जा करणार्‍या वाहनांची वर्दळ दिवसेंदिवस वाढत आहे. दर गुरुवारी तिसगाव येथे आठवडे बाजार भरतो. याठिकाणी जवळपासच्या 15 ते 20 गावचे लोक आठवडे बाजारच्या दिवशी येथे येतात. ग्रामपंचायतीने बांधलेल्या ओट्यांवर न बसता महामार्गाच्याकडेला रस्त्यावरच उभे राहून भाजी विक्री करत असल्याने दर गुरुवारी याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहनांची वाहतूक कोंडी होत आहे.

आठवडे बाजाराच्या दिवशी भाजीविक्रेते अथवा बाजार करण्यासाठी येणार्‍या व्यक्तीला कुठल्या प्रकारचा धोका निर्माण होऊ नये म्हणून गावचे सरपंच काशिनाथ पाटील लवांडे, उपसरपंच फिरोज पठाण, ग्रामपंचायत सदस्य इलियास शेख, पद्माकर पाथरे, पापा तांबोळी, अनिल वाघमारे यांच्यासह ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब सावंत यांनी बाजारात जाऊन भाजी विक्रेत्यांसह इतर व्यावसायिकांना ग्रामपंचायतीने बांधलेल्या काँक्रिट ओट्यावर सुरक्षित ठिकाणी बसण्याची विनंती केली.

पण तरी देखील दुसर्‍या आठवड्यात पुन्हा हे सर्व व्यापारी रस्त्यावर उभे राहून भाजी विक्री करू लागल्याने ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांना देखील डोक्याला हात लावण्याची वेळ आली.

ग्रामपंचायत पदाधिकारी व कर्मचारी यांनी वारंवार भाजी विक्रेते व व्यापार्‍यांना सुरक्षित ठिकाणी बसण्याचे आवाहन करत आहेत. परंतु त्याकडे व्यापारी डोळेझाक करत आहेत. गुरूवारी येथे होणारी प्रंचड गर्दी, वाहतूक कोंडीमुळे एखादा अपघात होऊ नये, कोणाच्याही जिवीतास धोका निर्माण होऊ नये, म्हणुन सुरक्षित ठिकाणी ओट्यावर व्यापार्‍यांनी बसले पाहिजे.

- फिरोज पठाण, उपसरपंच तिसगाव

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com