भाजीपाला विक्रेत्यांच्या करोना तपासणीमुळे गर्दीला लगाम

भाजीपाला विक्रेत्यांच्या करोना तपासणीमुळे गर्दीला लगाम

सुपा गावात ग्रामपंचायत, पोलीस आणि आरोग्य विभागाची कारवाई

सुपा |वार्ताहर| Supa

सुपा परिसरातील करोना वाढीचे मूळ असलेल्या भाजीपाला विक्रेत्याची ग्रामपंचायत व आरोग्य विभागाने करोना चाचणी घेण्यास सुरूवात केली. यामुळे भाजीपाला विक्रीच्या ठिकाणी असणार्‍या गर्दीला मोठा लगाम बसला आहे. ग्रामपंचायत, आरोग्य आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईमुळे हे शक्य झाले आहे.

गेल्या महिनाभरापासून सुपा गावात मोठ्या संख्येने करोना बाधित रुग्ण सापडत होते. तर अनेकांनी आपले प्राणही गमावले आहेत. गावात करोना वाढीचे मुख्य कारण म्हणजे भाजीपाला व फळबाजार आहेत. याठिकाणी भल्या सकाळीच मोठ्या प्रमाणात भाजी विक्रेते पारनेर रोड, बाजारतळ परिसर व शहाजापूर चौकात भाजी विक्रीसाठी बसत होते. हे भाजी विक्रेते सुरक्षेचे कोणतेच नियम पाळत नव्हते.

तोंडाला मास्क लावणे, हातमोजे न वापरणे, भाजीपाला विक्री स्टॉल पुढे गर्दी करत सामाजिक अंतराचे पालन न करणे आदी कृत्य करत होते. तसेच ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना हे विक्रेते अरेरावी करत असल्याने होणार्‍या गर्दीतून गावात मोठ्या प्रमाणात करोनाचा संसर्ग होत होता. या विक्रेत्यांना वारंवार सांगूनही त्यांच्यावर वेगवेगळ्या पध्दतीने कारवाई करूनही ते कोणालाच जुमानत नव्हते. अखेर तहसीलदार ज्योती देवरे यांनी गावातील भाजी विक्रेते व विनाकारण फिरणारे यांच्या करोना टेस्ट करण्याचे आदेश दिले.

त्याअनुषंगाने सुपा ग्रामपंचायत, आरोग्य विभाग व पोलीस प्रशासन यांनी संयुक्त कारवाई करत शुक्रवारपासून रॅपिड अँटीजेन चाचणी सुरू केली. यात 177 व्यक्तींची तपासणी केली असता 24 व्यक्ती करोना बाधित आढळून आले. तर 37 व्यक्तींचे घशातील स्राव तपासणीसाठी घेण्यात आलेले आहेत. शनिवारी (काल) आरोग्य विभागाने ग्रामपंचायत चौकातच भाजी विक्रेत्यांसह विनाकारण फिरणार्‍या अशा 150 व्यक्ती तपासल्या यात 28 जण करोना बाधित आढळून आले तर 37 व्यक्तींचे घशातील स्राव घेण्यात आले. याठिकाणी बाधित आलेल्यांमध्ये भाजीपाला विक्रेते यांची संख्या मोठी असल्याने यामुळे ग्राहक व विक्रेते यांच्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दोन दिवसांपासून सुपा ग्रामपंचायत, आरोग्य विभागाने बाजारतळ चौकात रस्त्यावरच तपासणी चालू केल्याने विनाकारण फिरणार्‍यांना चांगलीच चपराक बसली आहे गावातील सर्वसामान्य नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले आहे. तसेच नियम मोडून वाहन चालविणार्‍यांवर व विनाकारण फिरणार्‍यांवर कारवाई करत 25 वाहन चालकांना पोलिसांनी 5 हजार 600 रुपये दंड ठोठावला असून 13 वाहन चालकांडून तीन हजार रुपये रोख दंड वसूल केला आहे.

भाजीपाला फळे विक्रेते व त्या भागातून येणारे-जाणारे या सर्वांची रस्त्यावर कॅम्प लावून तपासणी केली जाणार आहे. यामुळे विनाकारण होणारी गर्दी कमी होणार असून पोलीस प्रशासनाने मोठे सहकार्य केल्याने बाधित सापडल्याने संसर्गाचा पुढील धोका टळला आहे.

-योगेश रोकडे, सरपंच, सुपा.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com