वेदांता- फॉक्सकॉन प्रकल्प पळविणार्‍यांचा निषेध

राष्ट्रवादी युवकची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
वेदांता- फॉक्सकॉन प्रकल्प पळविणार्‍यांचा निषेध

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

वेदांता आणि फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाने येऊन राष्ट्रवादी युवकांनी निदर्शने केली. राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून गुजरातला प्रकल्प पळविणार्‍या केंद्र सरकारचा निषेध नोंदविण्यात आला.

या आंदोलनात राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, कार्याध्यक्ष संजय कोळगे, शहर जिल्हाध्यक्ष केतन क्षीरसागर, प्रा.माणिक विधाते, कार्याध्यक्ष अभिजीत खोसे, मनोज भालसिंग, अनंत गारदे, सुरेश बनसोडे, साहेबान जहागीरदार, केतन काळे, जॉय लोखंडे, गजेंद्र दांगट आदींसह युवक व सर्व सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महाराष्ट्र राज्यात वेदांता व फॉक्सकॉनसाठी सर्व भौगोलिक परिस्थिती आवश्यक परवानगी व अन्य सुविधा अनुकूल असूनही प्रकल्प गुजरातला पळविण्यात आला आहे.

यामुळे तमाम महाराष्ट्रातील युवक युवतींचा रोजगार हिरावला गेला. महाराष्ट्रात युवकांच्या हाताचे काम हिरावण्याचे काम करून महाराष्ट्राचा आर्थिक कणा मोडित काढण्याचे काम केंद्र व राज्य सरकार करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची जबाबदारी राज्य सरकारने स्विकारून रोजगार निर्मिती करून व हा प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात आणण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष पवार म्हणाले, दीड लाख युवकांचा रोजगार हिरावून राज्य सरकारच्या नाकावर टिच्चून वेदांता आणि फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला घेऊन जाण्यात आला आहे.

फक्त हा प्रकल्प गेला नाही, तर यामध्ये महाराष्ट्राची अस्मिता व स्वाभिमान सरकारने गमावला आहे. तरी देखील राज्य सरकार फक्त हार-तुरे घेण्यातच मशगूल असल्याचा त्यांनी आरोप केला. तर महाराष्ट्रातून औद्योगिक प्रकल्प जात राहिल्यास राज्याची बरबादी होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कपिल पवार यांनी राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळेच युवकांवर बेरोजगारीची कुर्‍हाड कोसळली असल्याचे स्पष्ट करून केंद्र व राज्य सरकारच्या धोरणाचा निषेध नोंदवला.

कोळगे म्हणाले, शिंदे -फडणवीस असंवेदनशील सरकारच्या निष्काळजीपणामुळे हा लाखोंची रोजगारक्षमता असलेला प्रकल्प महाराष्ट्राने गमावल्याने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी राज्यातील जनतेची माफी मागावी. गुजरातची निवडणूक तोंडावर आल्याने महाराष्ट्रातील भाजपा गुजरातचे हित जपण्यात व्यस्त दिसत असल्याचा आरोप त्यांनी केला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com