डॉक्टरांच्या आंदोलनामुळे जनावरांचा जीव टांगणीला

डॉक्टरांच्या आंदोलनामुळे जनावरांचा जीव टांगणीला

पावसाळ्यापूर्वीच्या घटसर्प, फर्‍या रोगाचे लसीकरण ठप्प

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगरसह राज्यातील पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी मागील आठवड्यापासून आंदोलन सुरु केले आहे. तर दुसरीकडे जनावरांच्या डॉक्टरांची श्रेणी 1 (एलडीओ) यांच्या संघटनेने कोविड विमा कवच मिळावे, अन्यथा शेतकर्‍यांच्या दारात जावून लसीकरण न करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जिल्ह्यातील जनावंरांचे लसीकरण पूर्णपणे ठप्प झाले असून यामुळे त्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

मागील आठवड्यापासून पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने ऑनलाईन रिपोटींगसह असहकार आंदोलन सुरू केले आहे. यात जनावरांचे लसीकरणाचा समावेश आहे. तसेच ऑनलाईन मासिक व वार्षिक अहवाल देणे, आढावा बैठकींना उपस्थित न राहणे, सर्व शासकीय व्हाटसअप ग्रुपमधून बाहेर पडणे या स्वरुपाचे आंदोलन सुरू आहे. आता दुसर्‍या टप्प्यात 25 जूनला राज्यातील विधानसभा व विधानपरिषद सदस्यांना निवेदने देण्यात येणार आहे. अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष डॉ.चंद्रशेखर सोनावळे यांनी दिली.

जिल्ह्यात जवळपास 16 लाख मोठी जनावरे असून यातील बहुतांशी जनावरांना जिल्हा परिषद पशूसंवर्धन विभागाच्यावतीने पावसाळ्यापूर्वी विविध आजारांपासून बचाव होण्यासाठी लस देण्यात येते. जिल्हा परिषद पशूसंवर्धन विभागाने घटसर्प रोगाच्या चार लाख, फर्‍या रोगाच्या चार लाख आणि शेळ्यांच्या लसीकरणासाठी 6 लाख लस विकत घेतलेली आहे. साधारण 15 दिवसांपूर्वी लसीकरणाला सुरूवात करण्यात आली. मात्र, मागील आठवड्यात पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने आंदोलन सुरू केले. त्यात आता एलडीओ (श्रेणी 1) डॉक्टरांच्या संघटनेने कोविड विमा कवचमध्ये त्यांचा समावेश नसल्याने शेतकर्‍यांच्या दारात जावून लसीकरण न करण्याचा निर्णय घेतला. यामुळे ग्रामीण भागात जवळपास पशूधनाचे सरकारी लसीकरण ठप्प झाले असून यामुळे जनावरांच्या आरोग्या प्रश्न निर्माण झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण जनावरांपैकी 20 ते 25 टक्के जनावरांचेच लसीकरण झाले असल्याचे पशूसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले.

पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेचे सदस्य असणारे डॉक्टर हे सर्वाधिक फिल्डवर जावून पशूधनाला सेवा देणारे डॉक्टर आहेत. त्यांच्या काम बंद आंदोलनाचा मोठा फटका जनावरांच्या लसीकरणाला बसला आहे. या डॉक्टरांची संख्या 141असून श्रेणी एकच्या डॉक्टरांची संख्या अवघी 88 आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com