वाटेफळ बायोडिझेल छापा; आरोपींची संख्या 17

केडगावच्या साबळेचा सहभाग, दोन दिवस पोलीस कोठडी
वाटेफळ बायोडिझेल छापा; आरोपींची संख्या 17

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर शहरात बायोडिझेल विक्रीचे मोठे रॅकेट पुरवठा विभाग व पोलिसांनी समोर आणले आहे. याची व्याप्ती वाढत आहे. कोतवाली पोलिसांनी केडगावात पकडलेल्या बायोडिझेल प्रकरणात 22 आरोपींचे नावे निष्पन्न झाल्यानंतर नगर ग्रामीण पोलीस विभाग व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नगर तालुक्यातील वाटेफळ शिवारात पकडलेल्या बायोडिझेल प्रकरणात 17 आरोपींचा सहभाग असल्याचे समोर आले आहे.

याप्रकरणी पोलिसांनी सुरूवातीला 11 जणांना अटक केली होती. केडगाव बायोडिझेल प्रकरणात असलेला संजय साबळे याला वाटेफळ बायोडिझेल प्रकरणात वर्ग करून घेण्यात आले आहे. त्याला शनिवारी न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी करत आहे.

रस्त्याच्या बाजुला खुलेआम बायोडिझेल विकणार्‍या तस्करांवर नगर ग्रामीण पोलीस विभाग व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला होता. नगर-सोलापूर रोडवरील वाटेफळ परिसरात ही कारवाई करण्यात आली होती. या कारवाईत बायोडिझेल, रोख रक्कम, टँकर, ट्रक, कार असा एक कोटी 75 लाख 40 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सुरूवातीला 11 जणांवर नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

या गुन्ह्याचा तपासादरम्यान आणखी 6 आरोपींचे नावे निष्पन्न झाली असून आरोपींची संख्या 17 झाली आहे. केडगाव बायोडिझेल प्रकरणात अटकेत असलेला आरोपी संजय साबळे हा वाटेफळ शिवारातही बायोडिझेलची विक्री करत असल्याने त्याला या गुन्ह्यात वर्ग करून घेण्यात आले आहे. दरम्यान पोलिसांनी सखोल तपास सुरू केल्याने या गुन्ह्याची व्याप्ती वाढली आहे. शिवसेनेचा शहर प्रमुख दिलीप सातपुते याचा बायोडिझेल प्रकरणात सहभाग आढळून आल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com