वरवंडीच्या तरुणास आत्महत्येस प्रवृत्त करणारे डिग्रसचे तिघे जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखेची नगरमध्ये कारवाई
वरवंडीच्या तरुणास आत्महत्येस प्रवृत्त करणारे डिग्रसचे तिघे जेरबंद
जेरबंद

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राहुरी तालुक्यातील वरवंडी येथील तरुण रोहित कचरू लांडगे (वय 24) याला आत्महत्येस प्रवृत्त करणार्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नगर शहरातील पाईपलाईन हाडको परिसरात अटक केली. छकुल्या ऊर्फ सतिष रावसाहेब बोरूडे (वय 19), मोईन अमीर शेख (वय 31), सिमा रावसाहेब बोरूडे (तिघे रा. डिग्रस ता. राहुरी) असे अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत.

रोहित लांगडे याची पत्नी शिवानी ही नेहमी डिग्रस येथील तिच्या माहेरी जात असे. 15 एप्रिल रोजी रोहित याची सासू बिट्टबाई मारूती शिनगारे व छकुल्या बोरूडे हे शिवानी हिला घेण्यासाठी वरवंडी येथे आले. पत्नीला घेण्यासाठी नेहमी छकुल्या बोरूडे हाच का येतो? असा प्रश्न रोहित याने सासू बिट्टबाईला विचारत पत्नीला माहेरी पाठविण्यास नकार दिला. याचा राग मनात धरून छकुल्या याने त्याच्या अन्य साथीदारांना त्याठिकाणी बोलून घेत रोहितला मारहाण केली होती. यानंतर 16 एप्रिल रोजी रोहितने आत्महत्या केली होती.

याप्रकरणी रोहितची आई शिवाबाई कचरू लांडगे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून रोहितला आत्महत्येस प्रवृत्त करणारी त्याची सासू, पत्नी, छकुल्या बोरूडे व इतरांविरूद्ध गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी यापूर्वी रोहितची सासू बिट्टबाई व पत्नी शिवानीला अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश इंगळे, पोलीस कर्मचारी दत्तात्रय हिंगडे, संदीप पवार, रवी सोनटक्के, मेघराज कोल्हे, लक्ष्मण खोकले, मच्छिंद्र बर्डे, भाग्यश्री भिटे यांच्या पथकाने तिघांना अटक केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com