राहुरी तालुक्यातील वरवंडीत कर्मचार्‍याला करोनाची बाधा
सार्वमत

राहुरी तालुक्यातील वरवंडीत कर्मचार्‍याला करोनाची बाधा

तालुक्यात करोना बाधितांची संख्या तेरा; 20 जण क्वारंटाईन

Arvind Arkhade

राहुरी|प्रतिनिधी|Rahuri

राहुरी तालुक्यातील वरवंडी येथील एका कर्मचार्‍याला करोनाची बाधा झाल्याचे आढळून आले आहे. दोन दिवसांपूर्वी वांबोरीत एक करोनाबाधित आढळल्यानंतर आता पुन्हा वरवंडीच्या एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने राहुरी तालुक्याच्या ग्रामीण भागाला करोनाचा धोका वाढू लागला आहे. तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या आता तेरा झाली आहे.

दरम्यान, वरवंडी येथील तो बाधित रुग्ण राहुरी येथील एका डॉक्टरांकडे उपचार घेण्यासाठी आल्याची माहिती समजली आहे. तालुक्यातील राहुरी शहरासह ग्रामीण भागातही सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाल्याने करोना बाधितांचा आलेख वाढत असल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.

वरवंडी येथील तो रुग्ण एका मोठ्या शासकीय संस्थेत कर्मचारी म्हणून सेवेत असून त्याचा अनेकांशी संपर्क आला आहे. तर तो राहुरीतही येऊन गेल्याने राहुरीकरांचे धाबे दणाणले आहेत. शहरासह ग्रामीण भागात सध्या सोशल डिस्टन्सच्या कोणत्याची नियमांचे पालन केले जात नाही. त्याकडे महसूल व पोलीस प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.

राहुरी तालुक्यात ग्रामीण भागात अनेकजण क्वारंटाईन करण्यात आले आहेत. मात्र, क्वारंटाईन केलेल्या रुग्णांना वेळेवर जेवण दिले जात नाही. त्यांची आरोग्य विभागाकडून मोठी हेळसांड होत असल्याच्या तक्रारी आहेत. राज्य शासनाकडून प्रत्येक तालुक्यातील क्वारंटाईन रुग्णांसाठी सुमारे 50 लाख रुपयांचा निधी आला असून मात्र, तरीही क्वारंटाईन केलेल्या रुग्णांची मोठी उपासमार होत आहे.

होम क्वारंटाईनचा शिक्का असलेले संशयित रुग्ण बाहेर मोकाट फिरत असल्याने त्यांच्याही प्रसाराचा धोका वाढू लागला आहे.

राहुरी शहरासह ग्रामीण भागात बाहेरून आलेले अनेक नागरिक विनापरवाना आले असून त्यांचाही धोका वाढला आहे. मात्र, याबाबत महसूल व आरोग्य प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.

दि. 14 जुलै रोजी वांबोरी येथे एक तर वरवंडी येथे एक असे दोन करोना बाधित रुग्ण आढळून आल्याने या दोन बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सुमारे वीस लोकांना क्वारंटाईन केल्याची माहिती मिळाली आहे.

देवळाली प्रवरा (वार्ताहर)- देवळाली प्रवरा नगरपरिषद हद्दीतील शेटेवाडी भागातील एका वस्तीवरील एक 36 वर्षीय तरुण करोनाबाधीत असल्याचे आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अण्णासाहेब मासाळ यांनी सांगितले, देवळाली प्रवरा नगरपरिषद हद्दीतील शेटेवाडी भागातील एका तरुणाचा दोन दिवसांपूर्वी नगर येथील विळद घाटातील हॉस्पिटलमध्ये स्त्राव घेण्यात आला होता. त्याचा अहवाल काल बुधवार दि.15 जुलै रोजी पॉझिटिव्ह आढळून आला असल्याची माहिती सायंकाळी आठ वाजता समजली. बाधित रुग्णास ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या कुटुंबातील पाच ते सहा व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले आहे. याठिकाणी तातडीने नगरपरिषदेचे जंतूनाशकाची फवारणी करणारे पथक दाखल झाले. परंतु रात्रीची वेळ व पावसामुळे कामात अडचणी येत होत्या. आज हा परिसर सील करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी सांगितले.

Deshdoot
www.deshdoot.com