वरखेड यात्रा भरवून गर्दी जमवल्याबद्दल 24 जणांवर गुन्हा दाखल

ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्यांसह पोलीस पाटील व देवस्थान विश्वस्तांचा समावेश
वरखेड यात्रा भरवून गर्दी जमवल्याबद्दल 24 जणांवर गुन्हा दाखल

सलाबतपूर |वार्ताहर| Salabatpur

नेवासा तालुक्यातील वरखेड देवी यात्रा भरवणं गाव कारभर्‍यांना चांगलंच महागात पडलं असून श्रीमहालक्ष्मी देवी विश्वस्त मंडळ, ग्रामपंचायत पदाधिकारी व पोलीसपाटलासह 24 जणांवर नेवासा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

करोनाबाबतचे जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन करीत यात्रेची गर्दी झाल्याबद्दल वरखेडच्या महालक्ष्मी देवी मंदिर समितीचे उपाध्यक्ष व विश्वस्त सदस्य, गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील यांच्यासह देवस्थान विश्वस्त मंडळासह एकूण 24 जणांवर गुन्हा झाला आहे. करोनाची तिसरी लाट येण्याची सर्वत्र भीती असतानाही वरखेड सारख्या ग्रामीण भागातील यात्रेस 20 हजार भाविक उपस्थित होते. तसेच या ठिकाणी देवीला नैवेद्य म्हणून सातशे ते आठशे बोकडबळी दिले गेले. या दोन्ही घटनांमुळे जिल्हा प्रशासन अत्यंत सतर्क झाले आहे.

स्थानिक मंदिर विश्वस्त व ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच पोलीस पाटील यांनी याबाबत हलगर्जीपणा दाखवलेला आहे. संतप्त झालेल्या पोलीस निरीक्षक व तहसीलदार यांनी स्वतः वरखेड येथे जाऊन सदरचे भाविकांना व दुकानांना हटवले होते.

श्री महालक्ष्मी देवी ट्रस्ट मंडळाचे उपाध्यक्ष व विश्वस्त सदस्य, गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य वरखेड व पोलीस पाटील यांनी करोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी देवी यात्रा भरु न देणे तसेच करोना विषाणूंचा प्रादुर्भाव टाळणे अपेक्षीत असतानाही त्याकडे दुर्लक्ष करुन यात्रा भरवून गर्दी जमा केली म्हणून श्री महालक्ष्मी देवी ट्रस्ट मंडळाचे उपाध्यक्ष व विश्वस्त सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व पोलीस पाटील संतोष घुंगासे यांच्याविरुध्द यात्रा भरविल्याबद्दल नेवासा पोलीस ठाण्यात हवालदार राहुल बबन यादव यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन 24 जणांविरुद्ध भारतीय दंड विधान कलम 188,26,270,290 सह, महाराष्ट्र करोना कोव्हीड-19 उपाययोजना अधिनियम-2020 चे कलम-11 तसेच भारतीय साथरोग प्रतिबंध अधिनियम-1897 चे कलम 2, 3, 4 प्रमाणे गुन्हा दाखल झाला.

गुन्हा दाखल झालेले 24 जण

लक्षाधीश लक्ष्मण दाणे, कडूपाटील गोविंद गोरे, देवराव भाऊराव शिरसाठ, रामभाऊ आसराजी हारदे, रंगनाथ मारुती पवार, रामचंद्र धन्नू कुंढारे रामदास नानासाहेब गोरे, नवनाथ नाथा वाघ, उत्तम कचरू शिरसाठ, भगवान काशीनाथ जगधने, रावसाहेब एकनाथ कुंढारे, सुरेश शंकर शिरसाठ, बाळासाहेब आश्रू शिरसाठ, विनोद जनार्दन ढोकणे, शशिकला शांतवन खरे, अशोक जयवंत दाणे, दत्तात्रय पिराजी हारदे, प्रियंका विलास उंदरे, शोभा श्रीरंग हारदे, सोनाली मोहिनेश्वर गणगे, राणी संजय आंबेकर, छाया भास्कर खरे, सुमन नंदू बिरुटे व संतोष भगीरथ घुंगासे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com