
वडाळा महादेव |वार्ताहर| Vadala Mahadev
श्रीरामपूर तालुक्यातील श्रीक्षेत्र सराला बेटावर जाण्यासाठी गोदावरी नदीपात्रात केटीवेअर बंधारा असून सध्या पूरसदृश परीस्थितीमुळे बंधार्यावरील भराव खचून मोठा जीवघेणा खड्डा निर्माण झाला आहे. परिसरातील नागरिकांनी येथून जाताना काळजी घ्यावी, स्वतःचा जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील श्रीक्षेत्र सराला बेट येथे पुराच्या पाण्यामुळे येथील बंधार्यावरील भराव खचून मोठा खड्डा झाला आहे. या भागातील प्रवासी, नागरिक स्वतःचा जीव धोक्यात घालून तसेच या खड्ड्यांमधून वाहने घेऊन ये-जा करत आहेत. नदीपात्रातील पाण्याची पातळी कमी जास्त होत असल्याने काही प्रवासी भरधाव वेगात पुलावरून स्टंटबाजी करून प्रवास करतात. त्यामुळे दुर्घटना घडण्याची भीती आहे.
तसे होऊ नये यासाठी परिसरातील नागरिकांनी यावरून जाताना काळजी घ्यावी, असे आवाहन वैजापूर महसूल विभाग तसेच वांजरगाव सजाचे कामगार तलाठी विक्रम रावसाहेब वर्पे यांनी केले आहे.