वांबोरी, उंबरे, ब्राम्हणीतून कोविड सर्वेक्षणाला विरोध

राहुरी तालुक्यातील सर्वेक्षण वादाच्या भोवर्‍यात सापडले
वांबोरी, उंबरे, ब्राम्हणीतून कोविड सर्वेक्षणाला विरोध
File photo

उंबरे |वार्ताहर| Umabre

राहुरी तालुक्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत कोविड कुटुंब सर्वेक्षणातील गलथानपणा उघड होत असतानाच आता तालुक्यातील उंबरे, ब्राम्हणी, वांबोरी परिसरातील ग्रामस्थांनी या सर्वेक्षणाला विरोध केला आहे. या सर्वेक्षणामुळे स्थानिक ग्रामस्थांना संसर्गाचा धोका असल्याचे कारण सांगून विरोध केला आहे.

राहुरी तालुक्यात दि. 28 पासून कोविड कुटुंब सर्वेक्षण सुरू झाले आहे. मात्र, प्रशासनाने सर्वेक्षण करणार्‍या पथकाची कोणत्याही प्रकारची आरोग्य चाचणी घेतलेली नाही. अशातच वांबोरी, ब्राम्हणी, उंबरे परिसरात सध्या करोना महामारीने थैमान घातलेले आहे. त्यामुळे करोनाबाधितांची संख्या या भागात दिवसेंदिवस वाढत आहे. अशावेळी येथील ग्रामस्थ आपल्या जिविताची काळजी घेत आहेत.

मात्र, या सर्वेक्षणामुळे आणखी मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. सर्वेक्षण पथकाला देण्यात आलेल्या चाचणी साहित्यातून संसर्ग होण्याची भिती ग्रामस्थांनी व्यक्त केली असून या पथकालाही बाधित झालेल्या ग्रामस्थांकडून करोना संसर्गाचा धोका संभवत असल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे. त्यामुळे आणखी संकट नको, म्हणून ग्रामस्थांनी आता या सर्वेक्षणालाच विरोध केला आहे. त्यामुळे राहुरी तालुक्यातील हे सर्वेक्षण वादाच्या भोवर्‍यात सापडले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com