वांबोरीतून राहुरीला ऑक्सिजन बेडची ‘अशीही पळवापळवी’

कोव्हिड सेंटर बनले आता क्वारंटाईन सेंटर - मुथा; ना. तनपुरेंवर ठेवला ठपका
करोना अपडेट
करोना अपडेट

उंबरे |वार्ताहर| Umbare

राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे ग्रामीण रुग्णालयामधील ऑक्सीजन बेड राहुरीला पळविल्यामुळे वांबोरीतील रुग्णांचे अतोनात हाल होत आहेत. वांबोरीतून राहुरीला ऑक्सिजन बेडची पळवापळवी करण्यात आल्याने आता वांबोरीतील कोव्हिड सेंटर निव्वळ क्वारंटाईन सेंटर बनल्याचा आरोप करीत त्याचा ठपका सामाजिक कार्यकर्ते व व्यापारी संजय मुथा यांनी नामदार प्राजक्त तनपुरे यांच्यावर ठेवला आहे.

वांबोरी येथे गेल्या काही दिवसांपूर्वी कोव्हीड सेंटर उभारण्यात आले. या रुग्णालयामध्ये करोनाग्रस्त रुग्णांना औषधोपचार केले जातात. याठिकाणी 20 बेडला ऑक्सिजन सुविधा असून 10 बेड सर्वसाधारण आहेत. एकूण तीस बेडची व्यवस्था केली आहे. असे असताना याठिकाणी असणारे आरोग्य पथक रात्रंदिवस करोनाग्रस्त रुग्णांची दखल घेत त्यांच्यावर उपचार करत होते.

परंतु याठिकाणची 20 बेडची सेवा बंद करून ती राहुरीला हलविण्यात आली. ना. तनपुरे यांनी ही ऑक्सिजन सेवा याठिकाणी सुरू ठेवून राहुरीला तालुक्याच्या ठिकाणी नवीन सुविधा उपलब्ध करण्याची गरज होती. तसे न करता वांबोरी ग्रामीण रुग्णालयातील ऑक्सिजन सेवा बंद केल्याने अनेक रुग्णांना या ऑक्सिजन सेवेअभावी वेगवेगळ्या ठिकाणी धावपळ करावी लागते.

25 हजार लोकसंख्येचे हे वांबोरी गाव असून या ठिकाणी अनेक खेड्यापाड्यातील नागरिक ऑक्सीजन सेवेचा फायदा घेत होते. येथे आणखी ऑक्सिजन बेड वाढविणे गरजेचे होते. तसे न करता हेच बेड राहुरीला हलविल्यामुळे नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला आहे. आता याठिकाणी उपचार केंद्र नसून होम क्वारंटाईन केंद्र सुरू झाले आहे. आता बाधित रुग्ण ठणठणीत असेल तरच वांबोरी ग्रामीण रुग्णालयामध्ये ठेवण्यात येणार आहे. रुग्णालयाचे प्रमुख डॉ. श्रीकांत पाठक, मेडिकल ऑफीसर भारती पेचे, डॉ. अंजली मंडलिक व त्यांचे सर्व पथक, वांबोरीतील सर्व खासगी डॉक्टर रात्रंदिवस आरोग्यसेवा करीत होते.

पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी ज्या पद्धतीने कोव्हिड सेंटर उभे केले, त्याच पद्धतीने राहुरी, पाथर्डी, नगर मतदारसंघामध्ये ना. तनपुरे यांनी स्वतः त्या पद्धतीने कोव्हिड सेंटर सुरू केले असते तर आज या मतदारसंघात करोनाग्रस्त रुग्णांचे हाल झाले नसते, अशी टीका मुथ्या यांनी केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com