वांबोरीला मिळणार मुळा धरणातून शुद्ध पाणी

ना. तनपुरेंच्या प्रयत्नातून योजनेच्या सर्वेला वांबोरीत प्रारंभ
वांबोरीला मिळणार मुळा धरणातून शुद्ध पाणी

उंबरे |वार्ताहर| Umbare

राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे मुळा धरणातून येणार्‍या पाणी योजनेच्या सर्व्हेला काल शनिवारपासून सुरुवात झाली.ना. प्राजक्त तनपुरे यांच्या प्रयत्नातून या योजनेचे काम सुरू आहे. वांबोरी पाणी योजनेच्या सर्व्हेसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांनी पाहणी केली. वांबोरी जलजीवन मिशन अभियान योजनेतून वांबोरी गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी योजनेचे सर्वेक्षण करण्याकरीता खासगी कंपनीची नेमणूक करण्यात आली आहे.

काल कंपनीने उपग्रहाच्या सहाय्याने डीजीपीएस प्रणाली द्वारे सर्वेक्षणाने काम सुरु केले आहे. पंधरा दिवसात सर्व्हे पूर्ण होण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. सर्व्हे होऊन आराखडा तयार करणे व अंदाजपत्रक तयार करणे, तांत्रिक मान्यता घेणे अशी कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याकरीता प्रयत्न चालू आहेत.

आजची ही प्राथमिक प्रक्रिया आहे. पुढील पंचवीस वर्षाची लोकसंख्या ग्राह्य धरून या योजनेचे सर्वेक्षण सुरु आहे. या योजनेला सुमारे अठ्ठावीस कोटी रुपये खर्च येण्याचा अंदाज आहे. या योजनेतून मुळा धरणातून पाणी उचलून लोखंडी पाईपद्वारे वांबोरीला पोहोचणार आहे. गावामध्ये अत्याधुनिक पद्धतीने जलशुद्धीकरण केंद्र उभारणी करून गावासहीत संपूर्ण वाड्यावस्त्यांवर प्रत्येक घरी पाणी जोडणी देऊन दररोज पाणी देण्याकरीता या योजनेचा उपयोग होणार आहे. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू आहे.

जि. प. चे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे हे प्रयत्नशील असून भविष्यात निधीची अडचण येऊन देणार नाही, असे ना.तनपुरेंनी सांगितले. काल सर्वेक्षणाची पाहणी जि.प. माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे, माजी सरपंच नितीन बाफना, किसन जवरे, तुषार मोरे, कृष्णा पटारे, ईश्वर कुसमुडे, पोपट देवकर, गोरख ढवळे, शंकर मोरे, बंडू पटारे, मोरे भाऊसाहेब, महेश साळुंके, राम काळे, ग्रामविकास अधिकारी बी. के. गागरे यांनी केली.

वांबोरी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मतदारांना दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी वांबोरी पाणीयोजनेच्या कामाचा सर्व्हे सुरू असून आगामी 25 वर्षाची लोकसंख्या ग्राह्य धरून काम होणार आहे. अत्याधुनिक पद्धतीने जलशुद्धीकरण केंद्राची उभारणी होणार असून लोखंडी पाईपद्वारे वांबोरीला मुळा धरणातून पिण्याचे पाणी मिळणार आहे. राज्यमंत्री तनपुरे, यांनी निधी उपलब्ध करुन दिला असून त्यामुळेच पाणीपुरवठा योजना मार्गी लागणार आहे.

- बाबासाहेब भिटे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com