वांबोरीत आजपासून आठदिवस जनता कर्फ्यू- पाटील

करोना विचारमंथन बैठकीत सर्वानुमते निर्णय
वांबोरीत आजपासून आठदिवस जनता कर्फ्यू- पाटील

उंबरे |वार्ताहर| Umbare

राहुरी तालुक्यातील वांबोरी परिसरामध्ये करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत अचानक मोठी वाढ झाली आहे.

हे संकट गावापासून दूर ठेवण्यासाठी आपल्याला सर्वानुमते गाव बंद करणे गरजेचे असून यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे कारखान्याचे माजी अध्यक्ष व पंचायत समिती सदस्य उदयसिंह पाटील यांनी केले.

राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे उदयसिंह पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय नेते, व्यापारी व ग्रामस्थांची करोना संकट सहविचार मंथन बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी पाटील यांनी आवाहन केले.

आज शनिवार दि.19 ते 26 सप्टेंबरपर्यंत आठदिवस गावात जनता बंद पाळण्याचेे ठरले. याप्रसंगी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे, वांबोरी ग्रामपंचायतीचे प्रशासक परदेशी, मंडळ अधिकारी दत्तात्रय गोसावी, कामगार तलाठी सतीश पाडळकर, ग्राम विकास अधिकारी बी.के. गागरे, भानुदास कुसमुडे, नितीन बाफना, संभाजी मोरे, किसन जवरे आदींनी मनोगत व्यक्त केले.

पाटील म्हणाले, करोना विषाणूचा संसर्ग अतिशय वेगाने पसरत आहे. गावामध्ये आत्तापर्यंत 80 करोना रुग्ण आढळले आहेत. त्यातील 61 रुग्णांची मागील अकरा दिवसांमध्ये वाढ झाली असून करोना खूपच वेगाने आपले हातपाय पसरवत आहे. करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आठदिवस गावबंद करून करोना संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी व्यापारी, नागरिक व सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन सहकार्य करावे, असे पाटील म्हणाले.

बाबासाहेब भिटे म्हणाले, वांबोरीत करोना रोखण्यासाठी गावबंदचा निर्णय योग्य असून सर्वांनी या निर्णयाचे स्वागत करावे. प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करून काटेकोरपणे जनता बंद पाळून करोना साखळी तोडली पाहिजेे.

याप्रसंगी माजी सरपंच कृष्णा पटारे, बापू मुथा, विशाल पारख, रवी पटारे, मनोज बिहाणी, भरत वर्मा,आबा पाटील,श्रीकांत झंवर, भाऊसाहेब ढाकणे,अरीफ कोतवाल,संतोष कदम, राजू शेख, पिंटू कटारिया यांच्यासह व्यापारी व नागरिक उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com