
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
नगर-औरंगाबाद महामार्गावर वांबोरी फाट्याजवळ एका 20 ते 25 वर्षाच्या अज्ञात युवकाचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकास्मत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
या घटनेची माहिती समजताच पोलीस अधीक्षक राकेश ओला, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक युवराज आठरे यांच्यासह पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. वांबोरी फाट्यापासून 100 मीटर पुढे नगर-औरंगाबाद महामार्गावर रस्त्याच्या कडेला जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला असून हा घातपात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शुक्रवार (दि. 6) रोजी रात्री साडेनऊ ते साडेदहाच्या दरम्यान घडली असावी. तसेच हा मृतदेह एका मोठ्या बॅगेत आणला असून रस्त्याच्याकडेला पेट्रोल टाकून पेटून दिला असावा असाही अंदाज वर्तवला जात आहे. या दरम्यान पोलिसांनी मृतदेह आढळला. मृतदेहाच्या खिशात एका शंभर रुपयांची नोट व एक कंगवा आढळून आला आहे. पोलीस अधीक्षक ओला यांनी तपासाच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक युवराज आठरे यांनी एक पथक तयार करून सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्याच्या सूचना केल्या आहेत. या घटनेचा उलगडा करण्यासाठी पोलिसांपुढे मोठे आव्हान आहे.