वांबोरी रूग्णालयात लसीकरणात वशिलेबाजी

गावपुढारी रूग्णालयातच बसतात ठाण मांडून
वांबोरी रूग्णालयात लसीकरणात वशिलेबाजी

उंबरे |वार्ताहर| Umbare

वांबोरीच्या ग्रामीण रुग्णालयात लसीकरणात वशिलेबाजी सुरू असून त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. दिवसभर उन्हातान्हात उभे राहून लस मिळत नसल्याने अनेकांना चकरा माराव्या लागत आहेत. मात्र, दुसरीकडे वांबोरीतील काही गावपुढारी दवाखान्यातच ठाण मांडून बसत असून त्यांच्या नातेवाईक व समर्थकांना लस टोचून घेत असल्याचा आरोप वांबोरी येथील युवा कार्यकर्ते अशोकराव पटारे यांनी केला आहे.

ते म्हणाले, बर्‍याच जणांना मागील दाराने आत घेऊन लसीकरण केले जात आहे. असे असतानाही डॉ. पेचे या ग्रामस्थांना सर्व काही शासन नियमानुसार सुरू असल्याचे सांगत आहेत. राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील ग्रामीण रुग्णालयात लसीकरणासाठी सध्या वांबोरी बाहेरून अनेकजण येत आहेत. स्थानिक ग्रामस्थांना लसीकरणात चालढकलपणा करण्यात येत आहे. गावातील काही कार्यकर्ते हे ग्रामीण रुग्णालय प्रशासनाला हाताशी धरून आपल्या नातेवाईकांचे व मित्रमंडळींना आधीच मागील दाराने त्यांची नावनोंदणी करून हे कार्यकर्ते त्यांचे टोकन आपल्याजवळ घेऊन ते टोकन कार्यकर्ते व नातेवाईकांना देत असून त्यानंतर त्यांची नातेवाईक व कार्यकर्ते या ठिकाणी लसीकरणासाठी जातात. सर्व नातेवाईकांना लस टोचून घेतल्याशिवाय बाहेर जात नाहीत. मोठ-मोठ्या चारचाकी वाहनातून लसीकरणासाठी त्यांचे नातेवाईक येत आहेत. त्यांना थेट आत प्रवेश दिला जात असून लगेच लसीकरण करून घेतले जात आहे.

ग्रामीण रुग्णालयामध्ये राजकीय हस्तक्षेप वाढल्यामुळे. सर्वसामान्य नागरिक हे उन्हात ताटकळत उभे रहात आहेत. या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय देखील नसल्याने अनेकजण पाणी-पाणी करीत आहेत. 45 वर्षांवरील नागरिकांचेच लसीकरण केले जात असले तरी 18 वर्षांवरील अनेकांनाही लस देण्यात आली आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना लस वेळेवर मिळत नाही. बर्‍याच जणांना दुसर्‍या डोससाठीही चारपाच चकरा माराव्या लागल्या आहेत. तरीही सर्वकाही सुरळीत सुरू असल्याचे येथील अधिकारी सांगत आहेत. भेदभाव न करताना सर्वांना लस देण्याची यावी, अशी मागणी युवा कार्यकर्ते अशोकराव पटारे यांनी केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com