वांबोरी घाटात लुटमार करणारी टोळी जेरबंद

गुन्ह्यात अल्पवयीन मुलांचा वापर
वांबोरी घाटात लुटमार करणारी टोळी जेरबंद

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

वांबोरी (ता. राहुरी) घाटामध्ये वाहन चालकांना अडवून लुटमार करणार्‍या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले. विकास बाळू हनवत (वय 24 रा. कात्रड ता. राहुरी), करण नवनाथ शेलार (वय 19 रा. मोरे चिंचोरे ता. नेवासा) असे जेरबंद केलेल्यांची नावे आहेत. आरोपींच्या एका अल्पवयीन साथीदारालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर याच टोळीतील सुरेश निकम व एक अल्पवयीन मुलगा पसार झाले आहेत. पकडलेल्या आरोपींकडून पोलिसांनी चार दुचाकी, दोन मोबाईल, रोख रक्कम असा एक लाख 73 हजार 700 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

रितीक प्रेमचंद छजलानी (रा. भिंगार, नगर) हे मांजरसुंबा येथे दुचाकीवरून वांबोरी फाटा मार्गे जात असताना गोरक्षनाथ गडाचे चढावर त्यांना चौघांनी मारहाण करुन त्यांच्याकडील एक लाख 16 हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या गुन्ह्यासह वांबोरी घाटात सतत घडणार्‍या लुटीच्या गुन्हाचा समांतर तपास गुन्हे शाखा करीत असताना विकास हनवत याची टोळी या लुटी करत असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती.

यानंतर निरीक्षक कटके यांनी त्यांच्या पथकाला सूचना करत हनवत याला जेरबंद केले. करण शेलार, सुरेश निकम व दोन अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने त्याने लुट केल्याचे कबूल केले. पोलिसांनी करण शेलार व एक अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. सहायक निरीक्षक सोमनाथ दिवटे, सहायक निरीक्षक मिथुन घुगे, उपनिरीक्षक गणेश इंगळे, पोलीस कर्मचारी नानेकर, हिंगडे, संदिप घोडके, मनोज गोसावी, सुनिल चव्हाण, संदिप पवार, सुरेश माळी, शंकर चौधरी, लक्ष्मण खोकले, दिपक शिंदे, रविकिरण सोनटक्के, ज्ञानेश्वर शिंदे, विशाल दळवी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

लुटीचे दोन गुन्हे उघड

अटक केलेले आरोपी व अल्पवयीन मुलाकडे पोलिसांनी चौकशी केली असता दोन ठिकाणी लुट केल्याची कबूली त्यांनी दिली. त्यांनी गजराजनगर (ता. नगर) व मोरे चिंचोरे शिवार (ता. नेवासा) या परिसरामध्ये वाहन चालकांना अडवुन लुटमार केली असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. यासंदर्भात नगर एमआयडीसी व सोनई पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. टोळीचा मुख्य सूत्रधार विकास हनवत याच्याविरूद्ध शनिशिंगनापूर, सोनई व सोनई पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com