वांबोरीत चिकनगुण्या, डेंग्यू, मलेरिया, हिवतापाने ग्रामस्थ त्रस्त

वांबोरीत चिकनगुण्या, डेंग्यू, मलेरिया, हिवतापाने ग्रामस्थ त्रस्त

आरोग्यव्यवस्था कोलमडली; ग्रामस्थ संतप्त; आंदोलनाचा इशारा

उंबरे |वार्ताहर| Umbare

राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे चिकणगुण्या, डेंग्यू, मलेरिया, हिवताप यासारख्या साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. सध्या वांबोरीतील खासगी सेवा देणारे डॉक्टर व मेडिकल कर्मचारीही डेंग्यूसदृश ताप, सर्दी, खोकला, आजाराने त्रस्त झाले आहेत. वांबोरी परिसरात शेकडो नागरिकही सध्या वांबोरीसह नगरच्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. या उद्भवलेल्या परिस्थितीकडे मात्र, आरोग्य व्यवस्था सपशेल डोळेझाक करून आरोग्य व्यवस्था करोना लसीकरणाच्या कामात व्यस्त असल्याचे भासवून गोरगरीब वांबोरीकरांना वार्‍यावर सोडून त्यांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. या परिस्थितीकडे तात्काळ लक्ष न दिल्यास प्रशासनाला जागे करण्यासाठी नागरिक रस्त्यावर येऊन आंदोलन करतील, असा इशारा देण्यात आला आहे.

संपूर्ण देशात मागील दीड वर्षापासून करोना महामारीची दहशत निर्माण झाली असून करोनाच्या नावाखाली मात्र, आरोग्यव्यवस्था एकदम निर्ढावल्याचे चित्र सध्या वांबोरी परिसरात पहावयास मिळत आहे.

तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या पावसामुळे गावातील मोकळ्या जागेत गवत वाढले आहे. तसेच अनेक ठिकाणी सांडपाणी रस्त्यावर साचले आहे. त्यातच पावसाच्या पाण्याची भर पडल्यामुळे वांबोरी गावातील दाट लोकवस्तीच्या परिसरातच डासांच्या उत्पत्तीला प्रतिकूल वातावरण निर्मिती झाली आहे आणि त्यामुळेच साथीच्या आजाराने डोके वर काढले असून गावातील खळवाडी, धनगरगल्ली, मुख्य बाजारपेठ, चिंचेचा पार, रोहिदास नगर, नगर वेस, माळी गल्ली, पारख मिल, विठ्ठलवाडी, जावईनगर, सुभाष नगर, आंबेडकरनगर यासह इतरही परिसरात हिवताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी, सांधेदुखी यासारख्या आजाराने शेकडो रुग्ण ग्रासले आहेत.

त्यातच विशेष म्हणजे वांबोरी गावातील रुग्णांना खासगी सेवा देणारे बारा ते पंधरा डॉक्टर व मेडिकल दुकानदारांवरही सध्या आपल्याच आजारावर उपचार घेण्याची वेळ आली आहे.

त्यामुळे वांबोरी परिसरामध्ये आरोग्य व्यवस्था पूर्णतः कोलमडून तीन तेरा वाजले आहेत. आरोग्य सेवकांची ही परिस्थिती असेल तर परिसरातील सर्वसामान्य नागरिकांचे हाल कसे असतील? या प्रश्नानेच हृदय पिळवटून जाते.

जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती अ‍ॅड. सुभाष पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून वांबोरीमध्ये सुसज्ज ग्रामीण रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे. परंतु तिथे आरोग्य व्यवस्थेची कायमच वाणवा पहावयास मिळते. तर एक जिल्हा सरकारी दवाखानाही आहे. या सर्व सुविधा उपलब्ध असूनही मात्र, वांबोरीकरांच्या नशिबी दुर्दैवच आहे. या दोन्ही रुग्णालयांवर गावातील नागरिकांचे आरोग्य व्यवस्थित रहावे, यासाठी शासन दर महिन्याला लाखो रुपये खर्च करते. परंतु हा खर्च पाण्यातच जात असल्याचे वांबोरीकर खंत व्यक्त करीत आहेत.

ग्रामपंचायतीने यंदाचा पावसाळा सुरू झाल्यापासून गवतावर तणनाशक व कीटकनाशक तसेच साचलेल्या पाण्याच्या डबक्यात फवारणी करून डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या ठोस उपाययोजना प्रभावीपणे केली नसल्यानेच परिसरात साथीच्या रोगाचे थैमान झाले असून यामुळे शेकडो नागरिकांना हकनाक आपले कष्टाचे पैसे रुग्णालयात घालण्याची वेळ आली आहे. त्यामुळे नागरिकांमधून ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य व्यवस्थेच्या कारभाराचा तीव्र निषेध व्यक्त होत आहे.

Related Stories

No stories found.