वांबोरीत भिटे-पटारे यांच्यात जुंपली

वांबोरीत भिटे-पटारे यांच्यात जुंपली

उंबरे |वार्ताहर| Umbare

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब भिटे व प्राध्यापक शामराव पटारे यांच्यामध्ये माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या समोरच राजकीय कलगीतुरा रंगला. यामुळे परिसरात एकच चर्चा रंगली असून करोनाच्या काळात नागरिकांचे मात्र चांगलेच मनोरंजन झाले.

वांबोरी ग्रामपंचायतमध्ये माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी करोना लसीकरण आढावा बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीनंतर ग्रामपंचायत विद्यमान सरपंच व सदस्य यांच्या वतीने खासदार तनपुरे यांचा सन्मान करण्याचे नियोजन असताना खासदार तनपुरे यांनी सत्कार स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर मात्र, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब भिटे यांनी तनपुरे यांना तुम्ही जर वांबोरी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या अगोदरचा सत्कार स्वीकारला नसता तर आत्ता ग्रामपंचायतीचा सरपंच आपला असता असा दोषारोप करतांनाच गेल्या दोन दिवसापूर्वी प्राध्यापक पटारे यांनी वांबोरी ग्रामपंचायतमध्ये व ग्रामीण रुग्णालयामध्ये निवडून न येणारे काही पुढारी लुडबूड करतात, याचा धागा धरून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे म्हणाले, वांबोरी ग्रामपंचायतीमध्ये काहींच्या बायका तर काहींच्या सुना येथे आहेत.

परंतु त्यांचे काम त्यांचे पती बघतात. ते चालते, मग बाबासाहेब भिटे ग्रामपंचायतीत येऊन बसण्या बाबतच तक्रारी का होतात? असे विचारत असतानाच बैठकीत उपस्थित असलेले प्राध्यापक शामराव पटारे यांनी माझ्या सुनेबद्दल काहीही बोलू नका, माझी सून निवडून आल्यापासून मी ग्रामपंचायतीत आलो नाही.

मला वांबोरी ग्रामपंचायत मध्ये व ग्रामीण रुग्णालय मध्ये हे निदर्शनास आले. ते मी जनतेसमोर प्रसिद्धीच्या माध्यमातून मांडण्याचे काम केले. त्यामुळे आमच्यावर बेछुट खोटे आरोप करण्यापेक्षा आम्हाला गोळ्या घालून एकदाच मारून टाका, अशा शब्दात खासदार तनपुरे यांच्यासमोरच कडाक्याचे भांडण जुंपले. दोन्ही बाजूने मोठ्या आवाजात सुरू झालेले कडाक्याचे भांडण पाहून काही क्षणातच बघ्यांची गर्दी वांबोरी ग्रामपंचायत परिसरामध्ये जमा झाली.

नेमके काय झाले कोणालाच काही कळत नव्हते. परंतु माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे व प्राध्यापक शाम पटारे यांनी एकमेकांना तोंडावर वाहीलेली लाखोली पाहून उपस्थितांचे मात्र, चांगलेच मनोरंजन झाले. शेवटी तनपुरे यांनी मध्यस्थी करून सर्वांनी एकत्रित काम करण्याचा कानमंत्र दिला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com