
वळण | Valan
आंबा, पेरु, डाळींब आदी फळबागा लावणारे शेतकरी आपण पाहतो. परंतु वर्षातील एक-दोन महिन्यांचा हंगाम असलेल्या जांभळाची बाग लावण्याचे धाडस राहुरी तालुक्यातील वळणच्या एका शेतकर्याने दाखवले असून ही फळबाग परिसरात कुतुहलाचा विषय ठरली आहे.
राहुरी तालुक्यातील वळण येथील प्रगतशील शेतकरी गणेश अशोक राजदेव यांनी आपल्या शेतात एक एकर क्षेत्रावर बारडोली वाणाची जांभळाची झाडे लावली आहेत.
जांभूळ पिक आयुर्वेदिक असून मधूमेहासाठी (डायबिटीस) जांभळे सर्वोत्तम असतात. जांभळाच्या बियापासून डायबिटीससाठी अनेक औषधी तयार करून औषध दुकानांमधून विकली जातात त्यामुळे जांभळाला चांगल्यापैकी भाव मिळतो.
या जांभूळ बागेविषयी माहिती देताना गणेश राजदेव म्हणाले, मी तीन वर्षांपूर्वी जांभळीचे तिनशे रोपे प्रतिनग 65 रुपये प्रमाणे वाकडी येथून आणली होती. शेतामध्ये चार बाय चार लांबीचे खड्डे घेऊन त्याच्यामध्ये शेणखत टाकले. त्यामध्ये एक-एक जांभूळ रोप लावले. अशी एकूण 300 झाडे लावली आहेत. पहिल्या वर्षी बागेत आंतरपीक म्हणून कांदा लागवड केली. कांद्याचे उत्पन्न देखील चांगल्यापैकी मिळाले. दुसर्या वर्षी कपाशी लावली होती. कपाशीचे देखील चांगल्यापैकी उत्पादन मिळाले. कापसाला भावही चांगल्यापैकी मिळाला.
चालू वर्षी बागेत गव्हाचे पीक घेतले असून गहू पीक देखील चांगले आले आहे. तीन वर्षात बागेत घेतलेली सर्वच आंतरपिके यशस्वी ठरलेली आहेत. शेती कामात वडील अशोक गोरक्षनाथ राजदेव, आई मंदाबाई राजदेव यांचे तसेच आमचे मोठे बंधू अनिल राजदेव हे देखील नेहमी मार्गदर्शन करतात तर शेतामध्ये मनीषा गणेश राजदेव. मुलगा युवराज. मुलगी वर्षा राजदेव हे सर्व शेतीकामात मदत करत असल्याचे गणेश राजदेव म्हणाले.
शेतकरी माधवराव पवार म्हणाले, राहुरी तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकर्यांनी उसाऐवजी फळपिकांकडे वळले पाहिजे. यामध्ये चिकू, केळी, पेरू, सीताफळे, डाळिंब अशा वेगवेगळ्या फळांच्या बागा लावल्या पाहिजेत. गणेश राजदेव यांना आपणच मार्गदर्शन केले.
राजदेव यांच्या जांभूळ बागेस अशोकराव खुळे, बाबासाहेब खुळे, बाबासाहेब कारले, मुकिंदा काळे, राजेंद्र काळे, संतोष काळे, संजय शेळके, जगन्नाथ खुळे, अशोकराव शेळके, रघुनाथ आढाव आदी शेतकर्यांनी भेटी देवून शेतीतील या नवीन प्रयोगाचे कौतुक केले.