वाकी ओव्हरफ्लो, निळवंडे निम्मे होणार
सार्वमत

वाकी ओव्हरफ्लो, निळवंडे निम्मे होणार

नदीला पाणी वाढले, मुळात 30 टक्के पाणीसाठा

Arvind Arkhade

भंडारदरा, कोतूळ|वार्ताहर|Kotul

भंडारदरा धरणानजीक असलेला 112.66 दलघफू क्षमतेचा वाकी तलाव काल सकाळी ओव्हरफ्लो झाला आहे. सकाळी 97 क्युसेकने ओव्हरफ्लो सुरू होता. पण त्यानंतरही पाण्याची आवक सुरू असल्याने दुपारनंतर या धरणातून विसर्ग 256 क्युसेकने पाणी प्रवरा नदीत जात होते.

भंडारदरा आणि वाकी परिसरात पाऊस होत असल्याने कृष्णवंतीही वाहती झाली असून हे पाणी आता प्रवरा नदीद्वारे निळवंडे धरणात जमा होत आहे. काल सकाळी 8300 दलघफू क्षमतेच्या निळवंडे धरणात 4077 (49 टक्के)पाणीसाठा होता. दिवसभरात 19 दलघफू पाण्याची आवक झाली.त्यामुळे सायंकाळी पाणीसाठा 4096 दलघफू झाला होता. त्यात हळूहळू वाढ होत असून हे धरणही आज निम्मे भरणार आहे. दरम्यान पाणलोटातही गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर भातपिकाच्या लावणीला शेतकर्‍यांनी पारंपरिक पद्धतीने सुरुवात केली आहे.

गत 24 तासांतील पाऊस मिमीमध्ये. घाटघर 105, रतनवाडी 95, पांजरे 65, वाकी 50. 12 तासांत भंडारदरा 17 मिमी.

मुळा पाणलोटातही पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे अकोले तालुक्यातील मुळा नदीतील पाणी वाढले आहे. सकाळी कोतूळ येथे 1273 क्युसेकने पाणी होते. ते सायंकाळी 3212 क्युसेक होते. 26000 क्षमतेच्या मुळा धरण साठ्यातही हळूहळू वाढ होत आहे. काल सकाळी या धरणातील पाणीसाठा 7779 (30 टक्के भरले) होता.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com