धक्कादायक : वाकडीत विहिरीत व्यावसायिकाचा मृतदेह आढळला

धक्कादायक : वाकडीत विहिरीत व्यावसायिकाचा मृतदेह आढळला

सलग दुसर्‍या दिवशी मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ

वाकडी |वार्ताहर| Vakadi

राहाता तालुक्यातील वाकडी येथे राहत्या घरातून दोन दिवसांपासून गायब असलेल्या व्यावसायिकाचा मृतदेह त्यांच्या घराच्या हाकेच्या अंतरावरील असलेल्या याच परिसरात सार्वजनिक विहिरीत आढळून आला आहे. दरम्यान सलग दुसर्‍या दिवशी वाकडीत मृतदेह आढळून आल्याने वाकडी परिसरात खळबळ उडाली आहे.

आयुब (लालाभाई) मोहम्मद शेख (वय 45) असे या इसमाचे नाव आहे. त्यांचा गावातील शिवाजी चौकात अंडापावचा व्यवसाय होता. बुधवार दि 21 एप्रिल रोजी सकाळी आयुब शेख हे राहत्या घरातून गायब झाले होते. त्यांच्या नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला असता ते सापडले नाहीत. त्यानंतर नातेवाईकांनी श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनला मिसिंगची नोंद दाखल केली होती. मात्र तीन दिवसांनी शुक्रवार दि. 23 एप्रिल रोजी सकाळी गावातील मुस्लिम तक्यातील परिसरातीलच सार्वजनिक विहिरीत त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगलेल्या अवस्थेत येथीलच एका युवकाने बघितला.

सरपंच डॉ. संपतराव शेळके यांनी श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनला माहिती दिली. पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, हे. कॉ. अशोक आढांगळे, पोलीस पाटील मच्छिंद्र अभंग, भाजपा राहाता तालुका उपाध्यक्ष राजेंद्र लहारे आदी घटनास्थळी उपस्थित होऊन विहिरीतील मृतदेह स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढून शवविच्छेदनसाठी श्रीरामपूर येथील ग्रामीण रुग्णालय येथे नेण्यात आला.

आयूब शेख हे परिसरात लालाभाई नावाने प्रचलित आहे. त्यांना एक मुलगा, एक मुलगी, आई, वडील असा परिवार आहे. त्यांचे कोणाशी वाद नव्हते. अंडापाव व अंडे विक्री करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असे.

श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हे. कॉ. अशोक आढांगळे करीत आहेत.दरम्यान पंचनामा करून शवविच्छेदन केल्यानंतर वाकडी येथे त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

सध्या उन्हाळ्याचे दिवस व करोनाचा धोका असल्याने तसेच विहीर अरुंद असल्याने आयूब शेख यांचा मृतदेह काढण्यात मोठ्या अडचणी निर्माण होत होत्या. विहिरीची खोलाई जास्त असल्याने खाली कोणीच उतरत नव्हते. दरम्यान पो. नि. साळवे यांनी आवाहन करताच गावातील एका तरुणाने धाडस दाखवत विहिरीत उतरून सदर मृतदेह वर काढण्यात यश आले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com