वाकडी गोदावरी कालव्यात आढळला महिलेचा मृतदेह

वाकडी गोदावरी कालव्यात आढळला महिलेचा मृतदेह

वाकडी |वार्ताहर| Vakadi

राहाता तालुक्यातील खंडोबाची वाकडी येथील गावातील चितळी रोड येथील शिरगिरे आखाडा परिसरात असलेल्या गोदावरी उजव्या कालव्यात

गावातीलच एका महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. सदर महिलेचे नाव सारजाबाई मुरलीधर जाधव (रा. जाधव वस्ती) वय वर्ष 75 असून सदर महिला तीन दिवसापासून घरातून बेपत्ता होती.

या महिलेच्या घरच्यांनी नातेवाईकांकडे शोध घेतला असता त्या मिळून आल्या नाही. मात्र काल दि. 22 रोजी सकाळी वाकडी येथील शिरगिरे आखाडा परिसरात असलेल्या गोदावरी कालव्यात पुलालगत झुडुपात एका महिलेचा फुगलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याचे महेश जाधव यांनी बघितले. तद्नंतर त्यांनी तात्काळ सरपंच संपतराव शेळके व उपसरपंच सुरेश जाधव यांना भ्रमणध्वनी वरुन माहिती दिली.

ही माहिती समजताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. तो मृतदेह बेपत्ता महिलेचा असल्याचे नातेवाईकांनी खात्री केली. सरपंच डॉ. संपतराव शेळके यांनी घटनेची माहिती श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनला दिली. पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, हेड कॉ. गोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन सदरील महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी श्रीरामपूर येथे नेण्यात आला.

वाकडी येथील शारजाबाई मुरलीधर जाधव या अगोदर न सांगता घर सोडून गेलेली होती. त्यांना पुन्हा सापडून घरी आणल्यावर परत तोच प्रकार घडत असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. मात्र ही महिला तीन दिवसापासून घरातून बेपत्ता होती. तसेच गोदावरी कालव्यास तीन दिवसापूर्वी पाणी आले आहे. या महिलेचा मृतदेह जास्त फुगलेल्या अवस्थेत होता यावरून हा मृतदेह किमान 24 तासापेक्षा जास्त वेळ पाण्यात असण्याची श्यक्यता आहे. त्याचप्रमाणे घटनास्थळ व महिलेचे घर हे अंतर कालवा मार्गे किमान तीन किमी आहे. दुपारनंतर पंचनामा करुन शवविच्छेदन करण्यात आले. श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन येथे अकस्मात मूत्यूची नोंद करण्यात आली. सारजाबाई जाधव यांच्यामागे एक मुलगा, दोन मुली, सुन, नातवंडे असा परिवार आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com