वाकडी |वार्ताहर| Vakadi

राहाता तालुक्यातील वाकडी येथे महावितरणच्या शेती वीज बिलाच्या वसुलीसाठी शेती विद्युत पुरवठा बंद केल्यामुळे

महावितरण विद्युत कंपनीचा निषेध म्हणून गाव बंद तसेच शिर्डी-शिंगणापूर बायपास रोडवर दोन तास रास्ता रोको करत शेतकर्यांनी निषेध करत विद्युत कंपनीच्या अधिकार्यांना धारेवर धरत शेतकर्यांनी विद्युत कंपनीच्या मनमानी कारभाराबद्दल तिव्र संताप यावेळी व्यक्त केला.

राहाता तालुक्यातील वाकडी येथे गेल्या दोन दिवसांपासून शेती लाईनवरील ट्रान्सफार्मरचा विद्युत पुरवठा हा महाविरण विद्युत कंपनीकडून विद्युत पुरवठा खंडित करावयाचे काम चालू होते. नेमके पिकांना सध्या पाण्याची तिव्र गरज असताना महावितरण कंपनीकडून नेमक बिलापोटी विद्युत पुरवठा खंडित करायचे काम चालू झाले होते.

याचाच निषेध म्हणून वाकडी गावातील शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार संघटना तसेच शेतकर्यांनी मिळून पुकारलेल्या गाव बंदला वाकडी तसेच गणेशनगर परिसरातील व्यापारी बंधूंनी स्वयंस्फूर्तीने उत्स्फूर्तपणे बंद ठेवत शेतकर्यांच्या रास्ता रोकोमध्ये सहभाग नोंदवला.

यावेळी शेतकरी संघटनेचे रुपेंद्र काले म्हणाले की, महावितरणचे अधिकारी हे कार्यालयात बसून असे निर्णय घेतात. शेतकर्यांचे मात्र यात नुकसान होते. करोनातून शेतकरी सुधारत नाही तर वीज कंपनीकडून सावकारी थकीत बिल वसुली चालू झाली. अजून पीक पण हातात नाही वीज कंपनीने थंडीच्या काळात शेतीसाठी रात्रपाळीचे लाईट देतात. बिबट्या तसेच हिंसक प्राणी यातून शेतकरी जीव मुठीत धरून पिकासाठी मरमर मरतो. आम्हाला दिवसा लाईट द्या, आम्ही 100 टक्के बिले भरणार.

विठ्ठल शेळके म्हणाले की, कुठलीही पूर्वकल्पना न देता विद्युत कंपनीकडून अचानक वसुलीचा बडगा उगारला आहे. शेतकरी सध्या हवालदिल झाला आहे. शेतीमाल कवडीमोल भावात विकला जातोय. यातून शेतकरी वाट काढत पिके उभी केली. आता हातातोंडाशी घास आला तो हिरावण्याचा डाव विद्युत कंपनीकडून चालला तो थांबवून तात्काळ शेती पंपाचा विद्युत पुरवठा सुरळीत करावा.

यावेळी चांगदेव पावसे, गणेशचे संचालक अॅड. भाऊसाहेब शेळके, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राजाभाऊ कापसे, बाळासाहेब कोते, जयसिंग लहारे आदीनी भाषणातून निषेध केला. याबाबत प्रहारचे जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे यांनी देखील वरिष्ठ अधिकारी यांना भ्रमणध्वनीवरून शेतकरी विज तोडणी थांबवून खंडित विद्युत पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी केली होती.

महावितरणचे अभियंता श्री. सोनवणे यांनी याठिकाणी उपस्थित राहत शेतकर्यांचे निवेदन स्वीकारले. यावेळी ते म्हणाले की, वीजबिल भरणे हे बंधनकारक असून शेतकर्यांनी वीज बिलाबाबत हप्त्याने वीजबिल भरावे व विद्युत कंपनीस सहकार्य करावे तसेच शासनाने शेतीपंपाच्या वीज बिलाबाबत तसेच नवीन वीज जोडणी बाबत नवीन योजना कार्यान्वीत केल्या आहेत.

या माध्यमातून शेतकर्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन यावेळी त्यांनी केले. वाकडी गाव मोठे असल्यामुळे गावात ग्राहकांच्या तक्रारी अथवा सेवासंबंधी येथे कार्यालय अथवा सेवा केंद्र सुरुवात करण्यात येईल. सध्यातरी ज्या ट्रान्सफार्मरचा विद्युत पुरवठा खंडित केला आहे तो सुरळीत केला जाईल. या आश्वासनावर शेतकर्यांनी आंदोलन मागे घेतले.

यावेळी लोकनियुक्त सरपंच डॉ. संपत शेळके, भाजपाचे तालुका उपाध्यक्ष राजेंद्र लहारे, बाळासाहेब भालेराव, रिपाइंचे सुभाष कापसे, प्रहारचे जालिंदर लांडे, भिमराज लहारे, मुरलीधर शेळके, गोरक्ष कोते, मच्छिंद्र येलम, शंकरराव लहारे, महेश जाधव, महेश लहारे, भाऊसाहेब लहारे, प्रवीण धनवटे, हरिभाऊ लहारे, सुभाष पानसरे, संजय येलम, महावितरणचे श्री. बेंडकुळे, शेतकर्यांसह वाकडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आश्वासन दिल्यानंतर सायंकाळपर्यंत महावितरणकडून वीज जोडणीचे काम चालू झाले होते.