
माळवाडगाव |वार्ताहर| Malvadgav
पावसाळा सुरू झाला की महिन्यानंतर जुलै, ऑगष्ट दरम्यान गोदावरीला पूर येणार, के. टी. वेअर पाण्यात बुडणार, पाणी ओसरले की बंधार्याचे दोन्ही बाजूंचे भराव तुटून जाणार, वाहतूक बंद पडली की वैजापूर तालुक्यातील बाजाठाण, चेंडुफळ, देवगाव (शनी) येथील ग्रामस्थ लोकवर्गणीतून मुरूम दगड टाकून दळणवळणासाठी रस्ता सुरू करणार, पाऊस, महापूर बंधारा दुरूस्ती अशी सलग चार पाच वर्षांपासूनची ही व्यथा आहे श्रीरामपूर-वैजापुरशी वर्दळीची वाहतूक असणार्या कमालपूर बंधार्यांची.
श्रीरामपूर-वैजापूर तालुक्याची सरहद्द समजल्या जाणार्या गोदावरी नदीवर नाऊर येथे पुल असून दुसर्या चांदेगाव-नागमठाण येथील पुलांचे काम अपुर्णावस्थेत आहे. श्रीरामपूर तालुका पाटबंधारे अखत्यारीत नाऊर, खानापूर, कमालपूर हे बंधारे तर वैजापूर अखत्यारीत वांजरगांव, सरालाबेट हा बंधारा येतो. नाऊर बंधार्यास पर्यायी पुलाचा मार्ग झाल्याने वाहतूक नाही. खानापूर बंधार्यावरून तुरळक वाहतूक चालते. वांजरगांव अन् आणि कमालपूर बंधार्यावरून सर्वाधिक वर्दळीची वाहतूक चालते.
या सर्व बंधार्याच्या वाहतूक मार्गाच्या तुलनेत कमालपूर बंधारा सलग चार वर्षांपासून दोन्ही बाजूने तुटतो आहे. कमालपूर बंधार्या पलीकडील नागमठाण, अवलगांव, हमरापूर, बाजाठाण, देवगाव (शनी), चेंडुफळसह गंगापूर तालुक्यातील नेवरगाव, वाहेगाव, मांजरी येथून श्रीरामपूर बाजार समितीत सर्वाधिक कांदा येत असल्याने वाहनांची मोठी वाहतूक असते. दैनंदिन दूध वाहतूक वाहने अन् विद्यार्थ्यांची संख्या श्रीरामपुरशी निगडीत आहे. याशिवाय श्रीरामपूरकडून वैजापूर तालुक्यात बहुसंख्येने शिक्षक, शिक्षिक्षीका या बंधर्यावरूनच ये-जा करतात.
आतापर्यत या बंधार्यावर बंधारा स्थापनेपासून कोट्यावधी रुपयांचा निधी दुरूस्तीसाठी खर्च करण्यात आला. बंधारा दुरूस्ती कामात निव्वळ डागडुजी दाखविण्यात आली. परंतू एका कामातही या कमालपूर बंधार्याचे दोन्ही बाजूंचे भरभक्कम काँक्रिट बांधकाम होऊ शकले नाही. गळीत हंगामात या बंधर्यावरून अवजड ऊस वाहतूक होत असतानाही तुटलेल्या बंधार्याचा भराव दुरूस्तीसाठी वैजापूर तालुक्यातील नदीकाठच्या गावकर्यांना साखर कारखाने मदत करत नाही. मात्र संभाजीनगर जिल्हा परिषद सदस्य, शिक्षण व आरोग्य समिती सभापती अविनाश गलांडे दरवर्षी जेसीबी मशिन पाठवून आपल्या जि. प. गटातील गांवकर्यांच्या मदतीला धावून येतात.