वैजापुरात रेशनिंगच्या तांदळाचा साठा जप्त

खुल्या बाजारात विक्रीला जात असल्याचा संशय
वैजापुरात रेशनिंगच्या तांदळाचा साठा जप्त

वैजापूर |प्रतिनिधी| Vaijapur

शासकीय अन्न धान्य वितरण व्यवस्थेमधील तांदूळाचा साठा काळाबाजारात विक्री करण्याचा गैरप्रकार वैजापूरात मोठया प्रमाणात सुरु झाला आहे. पोलिसांनी बुधवारी दुपारी जीवन गंगा वसाहतीसमोर वाहनातून सात किंटल वजनाचा सरकारी तांदुळाचा साठा खुल्या बाजारात विक्रीला जात असल्याचे संशयावरुन जप्त करण्याची कारवाई केली.

तसेच गुरुवारी सावतानगर वसाहतीत एका स्वस्त धान्य दुकानदारांनी खाजगी वाहनात तांदुळाचा भरलेला साठा काळा बाजारात विक्रीसाठी नेण्याची तयारीत असताना परिसरातील नागरिकांचे सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आल्यानंतर स्वस्त धान्य दुकानदारांने कारवाईचा ससेमिरा टाळण्यासाठी वाहनातील तांदुळ साठा पुन्हा दुकानात उतरवून घेऊन या प्रकाराची सारवासारव केली. दरम्यान तालुक्यात शासकीय वितरण व्यवस्थेमधील अन्नधान्याची काळया बाजारात नेण्याचे प्रकार सुरु झाले असताना पुरवठा विभागांची यंत्रणा गाफील असल्याचे समोर आले आहे.

बुधवारी दुपारच्या सुमारास वैजापूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक श्रीराम काळे, हवालदार संतोष सोनवणे, योगेश झाल्टे, अमोल मोरे यांचे पथक शहरात गस्त घालत असताना वैजापूर - खंडाळा रस्त्यावरील जीवन गंगा वसाहती जवळ त्यांनी वैजापूरचे दिशेने येणारी ओमनी कार क्रमांक एम. एच 04 ए. डब्ल्यू 8872 या वाहनाला थांबवून तपासणी केली.त्या वाहनात पोलीसांना अंदाजे सात किंव्टल तांदुळाचा साठा आढळून आला.

वाहनातील नबी बा अली खॉ पठाण वय 23, सोहेब खान अजीज खॉ वय 22 रा. कुंजखेडा ता. कन्नड या दोघांकडे तांदुळाचा साठा कुठून कुठे घेऊन चालले यावर त्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्यामुळे पोलीस पथकाला वाहनातील तांदूळ साठा सरकारी असल्याचा संशय आल्यामुळे वाहन जप्त करण्याची कारवाई केली. तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाला त्यांनी तांदूळ साठा सरकारी वितरण व्यवस्थेमधील आहे किंवा नाही यांची पडताळणी करुन अभिप्राय सादर करण्याचे पत्र दिले आहेत. अभिप्राय प्राप्त झाल्यानंतर या प्रकरणात नियमानुसार कारवाई केली जाईल असे हवालदार संतोष सोनवणे यांनी सांगितले.

नागरिकांची जागरुकतेमुळे धान्य तस्करीचा डाव फसला....

शहरातील सावता नगर परिसरात दुपारी एका स्वस्त धान्य दुकान चालकांने कार्ड धारकांना वाटपासाठी आणलेला तांदूळांचा साठा मालवाहतूक करणार्‍या जीप मध्ये भरुन काळया बाजारात विक्रीला नेण्याची तयारी केली होती.यांची कुणकुण परिसरातील नागरिकांना लागली होती.त्यांनी सदरील वाहन अडवून तहसील व पोलीसांना याठिकाणी कारवाई करण्यासाठी फोन सुरु केल्यामुळे हादरलेल्या दुकान चालकांने तांदुळाचा साठा वाहनातून उतरवून घेतला या प्रकाराचे व्हिडिओ व्हायरल झाले होते.बहुजन समाज पक्षाचे जिल्हा सचिव बाबासाहेब पगारे यांनी तहसीलदारांना या गारप्रकारावर कारवाई करण्याचे लेखी निवेदन दिल्यानंतर सावता नगर मधील तांदूळ साठा परस्पर विक्री प्रकरणाची चौकशीसाठी तहसीलदार राहुल गायकवाड यांनी पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार मनोहर वाणी यांना चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com