वैजापूर पोलिसांकडून काळ्या बाजारात जाणारे रेशनचे धान्य व दोन वाहने जप्त

वैजापूर पोलिसांकडून काळ्या बाजारात जाणारे रेशनचे धान्य व दोन वाहने जप्त

वैजापूर |प्रतिनिधी| Vaijapur

वैजापूर शहरासह तालुक्यात सरकारी धान्याची तस्करी सुरू असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. वैजापूर-गंगापूर राज्य महामार्गावरील एका नाल्याजवळ पोलिसांनी तांदळाची वाहतूक करणारी दोन वाहने पकडून पोलीस ठाण्यात लावली आहेत. उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाच्या पथकातील कर्मचार्‍यांनी शुक्रवारी रात्री उशिरा ही कारवाई केली.

वैजापूर-गंगापूर राज्य महामार्गावरील एका नाल्याजवळ दोन पिकअप वाहने (एम. एच. 15 एफ. व्ही. 6531 व एम. एच. 45 टी. 1413) शुक्रवारी रात्रीच्या सुमारास संशयास्पद उभे होते. त्याचवेळी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे वाहन येथून जात होते. या वाहनात पोलिस कर्मचारी रामेश्वर काळे व लक्ष्मण पंडित होते. तत्पूर्वी वैजापूर पोलीस ठाण्याचे कर्मचारीही तेथे होते. त्यांनी वाहनांची तपासणी केली असता त्यामध्ये स्वस्त धान्य दुकानांमार्फत वितरित केला जाणारा तांदूळ आढळून आला. या दोन्हीही वाहनांमध्ये तांदळाच्या 70 ते 75 गोण्या आढळून आल्या. वाहनातील गोण्या या रेशनच्याच असल्याची पुष्टी पोलिसांनी केली आहे.

याबाबत पोलिसांनी महसूल विभागाच्या पुरवठा विभागास पत्र दिले असून त्यानंतर याबाबत अधिक सत्य बाहेर येईल. दरम्यान, हा तांदूळ शहरातील एका नगरसेवकाच्या दुकानातून भरून तो काळ्याबाजारात विक्रीसाठी जात असल्याचीही चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. प्रारंभी ही वाहने पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचार्‍याने पकडल्यानंतर चालकांशी बोलणी सुरू असताना अचानक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या पथकातील कर्मचारी तेथे पोहचले. त्यानंतर बोलणी फिस्कटल्याची चर्चाही पोलीस कर्मचार्‍यांमध्ये आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com