
वैजापूर | प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांचा उध्द्वव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत पक्ष प्रवेश अंतिम टप्प्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा भगवा झेंडा ते हातात घेऊन पुढील राजकीय वाटचाल करणार आहेत.
येथील राष्ट्रवादी पक्ष संघटनेत पक्षश्रेष्ठीनी चिकटगावकरांचा ठोंबरे गटाला प्रवेश देण्यासाठी तीव्र विरोधाकडे दुर्लक्ष करुन प्रवेशाचा सोपस्कार आटोपून घेतल्यामुळे माजी आमदार चिकटगावकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडण्याची तयारी केली आहे. जवळपास महिनाभरा पासून त्यांनी मतदार संघातील १६५ गावाचा दौरा केला. समर्थकांशी कोणत्या पक्षात पुढील राजकीय भवितव्य सोईचे राहील याविषयी त्यांनी सल्लामसलत करण्यावर भर दिला.
या मतदार संघात मागील २५ वर्षात विधानसभा निवडणूकीत शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी या दोन प्रमुख पक्षाकडे सदस्य पदाचे पारडे राहिल्यामुळे बहुतांश कार्यकर्त्यांनी त्यांना उध्द्वव ठाकरे सेनेचा पर्याय निवडण्याचा सल्ला दिल्याचे समजते. तसेच महाविकास आघाडीचे समीकरणानुसार २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत या मतदार संघातून शिवसेनेचे प्रा.रमेश बोरनारे ४९ हजार मताची आघाडी घेऊन विजयी झाले होते.
आगामी विधानसभा निवडणूकीत या जागेवर शिवसेना ठामपणे दावा करणार असल्याचे सांगितले जात आहे. आमदार रमेश बोरनारे शिंदे सेनेकडे वळाल्यामुळे शिवसेनेला विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी तुल्यबळ उमेदवारांची गरज आहे.या सर्व बाजू राजकीय बेरजेचे बाजू लक्षात घेऊन चिकटगावकरांची शिवसेना प्रवेशाचे दिशेने वाटचाल सुरु झाली आहे. त्यांच्या पक्ष प्रवेशाचा मुहूर्त देखील अंतिम टप्प्यात आलेला आहे.
शिवसैनिकांशी समन्वयाचा सुसंवाद
राष्ट्रवादी काँग्रेस मधून ठाकरे सेनेचे मशाल हातात घेण्यापूर्वी माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी येथील शिवसेनेचे शाखा, विभाग, तालुकाप्रमुख ते निष्ठावंत शिवसैनिक आणि वरिष्ठ नेत्या सोबत पक्ष प्रवेशा विषयी त्यांनी सकारात्मक दृष्टिकोनातून चर्चेची फेरी पुर्ण केली.
पक्षश्रेष्ठीचा निर्णय मान्य राहील
शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिन वाणी यांनी माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांचा ठाकरे सेनेत प्रवेशा संदर्भा त्यांनी पक्षश्रेष्ठी जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील अशी प्रतिक्रिया दिली.