
वैजापूर | प्रतिनिधी
शेतात ट्रॅक्टरने नागरटी करत असताना अचानक समोर बिबट्या आला तर काय कराल? अंगावर शहारे आणणाराच हा प्रसंग ना पण, त्यातही सावध राहिलात, तर काहीही होणार नाही. हेच दर्शविणारा प्रसंग शनिवारी रात्री आठच्या सुमारास तालुक्यातील भादली शिवारात घडला.
शेतात कांदा लागवड करायची असल्याने मुकंदा जनार्दन सोनवणे हे भादली शिवारात असलेल्या (गट न.१०२) मध्ये शनिवारी रात्री नागरटी करत असताना ट्रेक्टर समोर चक्क बिबट्याच आडवा आला. मात्र, त्यांनी प्रसंगावधान राखल्याने अनर्थ टळला.
गेल्या काही दिवसा पासून भादली परिसरात वारंवार बिबट्या डोंगरउताराने भक्ष्याच्या शोधार्थ मानवी वस्तीकडे येत असतो. त्याची कल्पना परिसरातील गावकऱ्यांनाही आहे. शक्यतो सायंकाळ झाली की शेतकरी बिबट्याच्या भीतीने रानातून घराकडे लवकर जातात. अनेकदा शेतकऱ्यांनाही उसात वावर आढळून आला होता.
लोकांना बघून केवळ गुरगुरून तो डोंगराच्या बाजूलाच पसार होतो, अशी स्थिती असतानाही शनिवारी रात्री सोनवणे यांनी शेतात नागरटीचा बेत आखला. मात्र, त्यांनाही कोठे माहीत होते, की त्यांच्या ट्रॅक्टरसमोर चक्क बिबट्याच येणार आहे. केवळ ३० ते ४० फुटाच्या अंतरावर समोर उभा असलेला बिबट्या ट्रॅक्टरच्या लाइटच्या प्रकाशात सहज दिसत होता. सोनवणे यांनी प्रसंगावधान राखून स्तब्धता बाळगत बिबट्याला त्याच्या मार्गाने जाऊ दिले.
विशेष म्हणजे अश्या भीतिच्या प्रसंगी सुद्धा त्यांनी मोबाईलवर बिबट्याची छबी टिपली. त्यामुळे रानाच्या दिशेने निघालेल्या बिबट्या सोनवणेच्या मोबाईलमध्ये कॅमेराबद्ध झाला. मात्र, त्या भागात बिबट्या असल्याचे पुन्हा शिक्कामोर्तबही झाले. गेल्या काही दिवसा पासून या परिसरात बिबट्याचा वावर आहे.
तो जनावरांवर हल्लेही करतो, अशी स्थिती असल्याने त्याला पकडण्यासाठी पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. त्याकडे वन विभाग दुर्लक्ष करत आहे. लवकरात लवकर पिंजरा लावण्याकडे वन विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. दरम्यान, या घटनेनंतर भादली ग्रामपंचायतने रविवारी वन विभागाला पत्र देवून पिंजरा लावण्याची मागणी केली आहे.