
वैजापूर |प्रतिनिधी| Vaijapur
नविन वर्षाच्या पूर्वसंध्येला उपविभागिय पोलीस अधिकारी महक स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली वैजापूर पोलिसांनी छापा टाकून बेकायदा दारु विक्री करणा़र्या दोघांना पकडले. त्यांच्या ताब्यातून 17 हजार रुपये किंमतीचा देशी विदेशी दारुचा साठा, दोन मोबाईल व दुचाकी असा 87 हजार 340 रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
डवाळा खंडाळा रस्त्यावरील समृद्धी महामार्गाच्या पुलाजवळ शनिवारी ही कारवाई करण्यात आली. सुभाष साहेबराव फुलारे (32, रा. लाडगाव रोड) व संतोष शिवलाल सिंहरे (32, फुलेवाडी रोड) अशी त्यांची नावे आहेत. या दोघांना पोलिसांनी दुचाकीवर (एमएच 20 एफटी 3436) पांढ़र्या गोणीमध्ये 13 हजार 440 रुपये किंमतीच्या 192 बाटल्या असलेले चार खोके व तीन हजार 900 रुपये किंमतीच्या 26 विदेशी दारुच्या बाटल्या घेऊन जात असताना पकडले.
त्यांच्याकडे दारुविक्रीचा परवाना नव्हता. पोलीस अंमलदार लक्ष्मण पंडित, हेड कॉन्स्टेबल पडळकर, कॉन्स्टेबल रामेश्वर काळे यांनी ही कारवाई केली. याप्रकरणी पंडित यांनी फिर्याद दिली आहे.