वैजापूरात खळबळ! मंदिरामागे आढळला पुरोहिताचा मृतदेह

खून झाल्याचा संशय
वैजापूरात खळबळ! मंदिरामागे आढळला पुरोहिताचा मृतदेह

वैजापूर | प्रतिनिधी

मंदिरात पौरोहित्य करणाऱ्याचा एका 55 वर्षीय पुरोहिताचा खून झाल्याची खळबळजनक घटना 9 डिसेंबर रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास शहरालगतच्या नारंगी मध्यम प्रकल्प परिसरात उघडकीस आली.

या परिसरातील गवळीबाबा मंदिराच्यामागे त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांचा खून कशाने व कशामुळे करण्यात आला. याचा उलगडा अद्याप झाला नसला तरी त्यांच्या हातासह डोक्यावर मारहाण करून घटनास्थळी रक्ताचे डाग आढळून आले. कैलास गणपत चव्हाण (55) रा.बुरुडगाव रोड, भोसले आखाडा, अहमदनगर असे या मृत पुरोहिताचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरानजीकच्या नारंगी मध्यम प्रकल्प परिसरात असलेल्या गवळीबाबा मंदिर असून तेथेच असलेल्या एका झोपडीत पुरोहित कैलास चव्हाण वास्तव्यास होते. गेल्या दीड वर्षांपासून ते या मंदिरात पौरोहित्य करून ते तेथेच राहत असल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.

दरम्यान 9 डिसेंबर रोजी दुपारी चार वाजेच्या परिसरातील एका शेतकऱ्यास मंदिराच्या पाठिमागील बाजूस पुरोहिताचा मृतदेह दिसल्याने त्याने या घटनेची माहिती तात्काळ वैजापूर पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिस निरीक्षक सम्राटसिंह राजपूत, सहायक पोलिस निरीक्षक राम घाडगे, योगेश झाल्टे, विजय भोटकर, प्रशांत गीते आदींनी घटनास्थळी धाव घेतली.

पुरोहित चव्हाण यांचा मृतदेह गवळीबाबा मंदिराच्या पाठिमागील बाजूस असलेल्या झाडाझुडुपात पोलिसांना आढळून आला. पाहणीदरम्यान घटनास्थळी पोलिसांना रक्ताचे डाग, सायकल व थोड्याच अंतरावर काठीही आढळून आली. याशिवाय याच ठिकाणी असलेल्या एका पिशवीत 'वशीकरण' शीर्षक असलेले पुस्तकही पोलिसांना आढळून आले.

गुरुवारी मध्यरात्री मंदिर परिसरात आरडाओरड ऐकू येत होती. अशी माहितीही परिसरातील शेतकऱ्यांनी यावेळी पोलिसांना दिली. मृदेहाच्या शवविच्छेदन अहवालानंतरच घटनेचे नेमके सत्य बाहेर येईल. असे पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com