
वैजापूर | तालुका प्रतिनिधी
वैजापूर तालुक्यातील अगरसायगाव येथे धक्कादायक घटना समोर आली आहे. सावत्र मुलाने आईचा खून केल्याचा खळबळ जनक प्रकार सकाळी 11.30 वाजेच्य सुमारास घडला. आशाबाई घमाजी जाधव (वय 48) असे या घटनेतील मयत आईचे नाव असून, नानासाहेब घमाजी जाधव (वय 33) असे खून करणाऱ्या सावत्र मुलाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून व स्थानिकांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नानासाहेब यांचा आपल्या सावत्र आई आशाबाई यांच्याशी शेतीच्या कारणावरून वाद झाला होता. या वादातून नानासाहेब याने शनिवार (दि 1) रोजी सकाळी 11.30 वाजेचा सुमारास विळ्याने गळ्यावर व चेहऱ्यावर वार केले. गंभीर दुखापत झाल्याने आशाबाई यांचा जगेच मृत्यू झाला. या घटनेत आरडा ओरडा झाल्याने परिसरातील नागरिक त्या ठिकाणी धाऊन आले. त्यांना नानासाहेब याने आपल्या सावत्र आईचा खून केल्याचे बघितले. नागरिकांना बघताच नानासाहेब याने शेतातील विहिरीकडे पळ काढत विहिरीत उडी घेत जीवन यात्रा संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिकांनी त्याला बाहेर काढत घटनेची माहिती वैजापूर पोलीसांना दिली.
घटनेची माहिती मिळताच वैजापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय लोहकरे, उपनिरीक्षक पाटील, उपनिरीक्ष रज्जाक शेख, ज्ञानेश्वर शिंदे, भगवान सिंगल, पवार, गणेश पठारे, आय बाईक पथकाचे जोणवाल गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले व घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविचछेदनासाठी वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला. या प्रकरणी अधिक तपास वैजापूर पोलीस करीत आहे.