
वैजापूर (प्रतिनिधी)
वैजापूर तहसिल कार्यालयाच्या इमारतीतील शौचालयास कुलूप ठोकण्यात आल्याने शासनाने लाखो रुपये खर्चून उपलब्ध करून दिलेल्या सुविधांचा नागरिकांना फायदा मिळत नाही. यात महिला वर्गाची सर्वाधिक हेळसांड होत असून शौचालयास कुलूप असल्याने महिलांची मोठ्या प्रमाणत गैरसोय होत आहे.
सध्या वैजापूर तालुक्यात एकूण 25 ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्या असून त्यात 77 प्रभागांसाठी 215 जागांसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकांचे नामनिर्देशन भरण्यासाठी ग्रामीण भागातून दररोज शेकडो उमेदवार व समर्थक तहसील कार्यालयात येत आहेत. ज्यामध्ये महिलांचा देखील समावेश आहे, तहसील कार्यालय हे नुकतेच डेपो रोडवरील डी. एड. कॉलेजच्या इमारतीत स्थलांतरित झाले आहे, जवळपास 50 लाख रुपये खर्चून या इमारतीचे रुपांतर प्रशस्त इमारतीत करण्यात आले, येणार्या नागरिकांसाठी शौचालय देखील बनविण्यात आले. परंतु इतकी सुंदर इमारत करूनही तेथील शौचालयाला कुलूप ठोकण्यात आले आहे.
यामुळे नागरिकांना उपलब्ध करून दिलेल्या सुविधांचा फायदा मिळत नाही. यात महिला वर्गाची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. कर्मचारी वर्गाने कुलूप ठोकले असल्याने ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांना उघड्यावर मलमूत्र विसर्जन करावे लागत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. एकीकडे प्रशासकीय अधिकारी स्वच्छ भारत स्वच्छ कार्यालय या मोहिमेत नागरिकांना स्वच्छ्ता राखण्याचे आवाहन करतात तर दुसरीकडे त्यांच्याच कार्यालयात कर्मचार्यांकडून शौचालयाला कुलूप ठोकून नागरिकांना शौचालयासाठी उघड्यावर जाण्यास भाग पाडत आहेत. याबाबत अधिकारी वर्ग अशाप्रकारे भूमिका घेतात व काय कारवाई करतात हे बघण्याजोगे असेल. या समस्येकडे तत्काळ लक्ष देऊन शौचालयाला ठोकलेले कुलूप काढून नागरिकांना खुले करावे, जेणेकरून परिसरात स्वच्छता राहील, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.