बजेटमध्ये कपात करून सरकारने आदिवासी समाजावर अन्याय केला - पिचड

बजेटमध्ये कपात करून सरकारने आदिवासी समाजावर अन्याय केला - पिचड

अकोले| प्रतिनिधी| Akole

आदिवासी समाज लॉकडाउनमुळे मेटाकुटीला आला असताना त्यांच्यासाठी कल्याणकारी योजना राबविणे गरजेचे असताना उलट आदिवासी विकास विभागाच्या बजेटमध्ये कपात केली जात आहे. हा आदिवासी समाजावर अन्याय असल्याचे मत माजी आमदार वैभवराव पिचड यांनी व्यक्त केले आहे.

जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधत येथील आदिवासी उन्नती सेवा मंडळाने संस्था अंतर्गत तसेच राजूर परिसरातील विविध शाळांमध्ये दहावीच्या परीक्षेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा व शिक्षक आणि मुख्याध्यापक यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. यावेळी माजी आमदार पिचड बोलत होते.

संस्थेचे सचिव प्रा. एम. एम. भवारी, अध्यक्ष भरत घाणे, प्रा. डॉ. सुनील घनकुटे, सभापती उर्मिलाताई राऊत, उपसभापती दत्तात्रय देशमुख, सी. बी. भांगरे, गणपत भांगरे, माधव गभाले, सुनील सारोकते, सरपंच गणपत देशमुख, भास्कर येलमामे, सुरेश भांगरे, दौलत देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

पिचड म्हणाले की, विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता वाढत आहे ही आनंदाची बाब आहे. यामागे शिक्षकांचे मोठे योगदान आहे. विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश कौतुकास्पद असे असून त्यांनी ठरवलेले उद्दिष्ट गाठण्यासाठी परिश्रम आणि मेहनत करावी. लॉकडाऊनच्या काळात सध्या ऑनलाईन शिक्षण सुरू आहे, मात्र पालक वर्ग गरीब आहे,

हाताला काम नाही, रोजंदारी बंद आहे, उशिरा आलेल्या पावसामुळे भात शेती धोक्यात आहे, मोबाईलला रेंज नाही, मोबाईल घेण्यास पैसे नाही, अशा समस्या मांडताना आदिवासी भागात मोबाईल टॉवर उभे करा, मोबाईल घेण्यासाठी पालकांना रक्कम द्या, अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी प्रा. डॉ. घनकुटे यांनी मनोगतातून आदिवासी समाजाच्या अडीअडचणीचा उहापोह मांडला.प्रास्ताविक अशोक भालेराव यांनी केले. सूत्रसंचालन राम पवार यांनी केले तर आभार किरण चौधरी यांनी मानले.कार्यक्रमानंतर माजी आमदार पिचड व अन्य मान्यवरांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com