पाऊस सुरू होण्यापूर्वी आगाऊ चार महिन्यांचे रेशन धान्य द्यावे - पिचड
अकोले |प्रतिनिधी| Akole
अकोले तालुका हा आदिवासी, अतिदुर्गम व डोंगराळ आहे. या भागात पावसाळयामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होत असते. त्यामुळे येथील नागरिकांना घराबाहेर पडणे अवघड होत असते. तसेच दळणवळणाचे साधनही वेळेवर उपलब्ध होत नाही. तालुक्यातील बहुतांशी रेशन धारक हे रेशनचे मूळ लाभार्थी आहेत. सध्या काही दिवसात पावसाळा सुरू होणार आहे. जेणेकरून नागरीकांना धान्यांची अडचण निर्माण होऊ नये यासाठी आगाऊ चार महिन्यांचे रेशन धान्य देण्यात यावे, अशी मागणी माजी आमदार वैभव पिचड यांनी केली.
जिल्हाधिकारी अहमदनगर व जिल्हा पुरवठा अधिकारी अहमदनगर यांना पाठविलेल्या पत्रामध्ये त्यांनी लिहिले की, सतत तीन वर्षे करोनाच्या महामारीमुळे रोजगार हमीचे कामे नाहीत. तसेच इतर ही बहुतांशी उद्योगधंदे बंद आहेत. गोरगरिबांच्या हाताला कामे नाहीत. या सर्व गोष्टींचा विचार चार महिन्यांचे आगाऊ रेशन धान्य पावसाळ्यापूर्वी मिळावे, अशी माफक अपेक्षा जनतेची आहे.
माहे एप्रिल व मे या दोन महिन्यांचे रेशन धान्य वाटप करा
तालुका हा आदिवासी, अतिदूर्गम व डोंगराळ असून खेडोपाड्यांनी विखुरलेला आहे. अकोले तालुक्यामध्ये माहे एप्रिल व मे या महिन्यांचे रेशनधान्य नागरिकांना मिळालेले नाही, ही अतिशय चिंताजनक बाब आहे. सदर रेशन धान्य न मिळाल्याने काही नागरिकांना गहू व तांदूळ विकत घ्यावे लागत आहे. तालुक्यामध्ये कोणत्याही प्रकारचे नागरिकांच्या हाताला कामे नाहीत. अशा परिस्थितीत जीवन कसे कठायचे हा प्रश्न जनतेसमोर उभा राहिलेला आहे. अशातच मागील दोन महिन्यांचे रेशन धान्य न मिळाल्याने जनतेमध्ये वेगवेगळे संभ्रम निर्माण झालेले आहेत.
तरी अकोले तालुक्यातील नागरिकांना माहे एप्रिल व मे या दोन महिन्यांचे रेशन धान्य देण्यात यावे, अशी मागणी माजी आमदार वैभवराव पिचड यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे केली आहे.