तुम्ही लोकप्रतिनिधी आहात तालुक्याचे बाप नाहीत

वैभव पिचडांनी कोणाला सुनावले
तुम्ही लोकप्रतिनिधी आहात तालुक्याचे बाप नाहीत
वैभव पिचड

अकोले |प्रतिनिधी| Akole

करोना या संकट काळात रुग्ण व नागरिकांना मदत करण्या ऐवजी तालुक्याचे लोकप्रतिनिधी वेळो वेळी स्टंट बाजी करत आहे. आपल्या हस्ते उदघाटन झाले नाही तर कोविड सेंटरला ऑक्सिजन देणार नाही अशी धमकी ते देत आहे. असा गंभीर आरोप माजी आमदार वैभवराव पिचड यांनी आ. डॉ. किरण लहामटे याांचे नाव न घेता केला आहे. तुम्ही लोकप्रतिनिधी आहात म्हणजे तालुक्याचे बाप नाहीत असे त्यांनी आमदारांना सुनावले.

तालुक्यातील सुगाव खुर्द येथे काल सोमवारी 50 ऑक्सिजन युक्त बेड कोविड सेंटरचे उदघाटन करण्यावरुन झालेल्या मानापमान नाट्याच्या पार्श्वभूमीवर ते पत्रकारांशी बोलत होते. पिचड पुढे म्हणाले की, तालुक्यातील सर्व शिक्षक, दानशूर व्यक्ती,संस्थां यांचे योगदानातून सुगाव खुर्द येथे ऑक्सिजन बेडचे कोवीड सेंटर सुरू करण्यात आले.

लोकप्रतिनिधी ही जबाबदार व्यक्ती असून त्यांनी तुम्हाला ऑक्सिजन कोण देणार आहे असे म्हणणे शोभत नाही. करोना रुग्ण ऑक्सिजन वाचून हैराण झालेले आहेत, काहींनी प्राण गमावला आहे असे असताना फीत कापून देत नाही म्हणून ऑक्सिजनचे राजकारण करण्याची भाषा शोभत नाही, तुम्ही ऑक्सिजन घरून देणार नाहीत अशी टीका करीत तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, तुम्ही तालुक्याचे बाप नाहीत अशा शब्दात आमदारांना सुनावले.

तसे असेल तर त्याला वेळ आल्यावर उत्तर देऊ असेही ते म्हणाले. तालुक्यात आरोग्य सेवा हतबल झाली आहे,रेमडीसीविर चा हिशोब नाही,रुग्णाकडून रमेडिसीवीर चे बिल उकळले जात आहे, आरोग्य कर्मचारी कमी आहे, ठराविक आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांच्यावर ताण येत आहे. त्यांना बदली कर्मचारी मिळत नाही, राजूर, समशेरपूर, कोतुळ, अगस्ति देवस्थान येथे सुरू झालेले कोविड सेंटर लोकसहभागातून उभे राहिले आहेत, त्यांना वेळेवर औषधे मिळने आवश्यक आहे.

रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी काही युवक ऑक्सिजन सिलेंडर मिळविण्यासाठी रात्रभर फिरले. तुम्ही स्वतः डॉक्टर आहात, तुम्हाला मोठ्या अपेक्षेने जनतेने निवडून दिले आणि तुम्ही याबाबत काहीच करीत नाही हे दुर्दैव आहे. फक्त स्टंटबाजी करण्यातच तुम्ही पुढे आहात असा टोलाही त्यांनी लगावला.

सुगाव खुर्द येथील अडीच कोटी रुपयांचे प्राथमिक आरोग्य केंद्र माझ्या आमदारकीच्या काळात उभे राहिले, ग्रामपंचायत सुगावने त्यावेळी ना हरकत प्रमाणपत्र दिले हे लोकप्रतिनिधी विसरलेले दिसतात. ज्यांचे सहकार्यामुळे ही इमारत उभी राहिली ते जि. प.सदस्य कैलासराव वाकचौरे, जालिंदर वाकचौरे यांचीही लोकप्रतिनिधी वाट पाहू शकले नाही, हे दुर्दैव आहे.

आपण लवकरच कोतुळ, समशेरपूर, अकोले,राजूर व जेथे जेथे कोवीड सेंटर आहेत. तेथे ऑक्सिजन बेड्स उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. असे सांगितले. तसेच तालुक्यातील नागरिकांनी या कामी आपले योगदान द्यावे असे आवाहन पिचड यांनी केले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com