अमृतसागर दूध उत्पादकांसह कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करणार - वैभव पिचड

अमृतसागर दूध उत्पादकांसह कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करणार - वैभव पिचड

अकोले (प्रतिनिधी)

अकोले तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी निश्चितच गोड करू, जास्तीत जास्त रिबेट देण्याचा अमृतसागर दूध संघाचा प्रयत्न असून, कर्मचाऱ्यांना देखील बोनस व वेतन वाढ देणार अशी ग्वाही अमृतसागर सहकारी दूध संघाचे चेअरमन तथा माजी आमदार वैभव पिचड यांनी दिली आहे.

अकोले तालुक्यातील शिखर संस्था समजल्या जाणाऱ्या अमृतसागर सहकारी दूध व्यावसायिक व प्रक्रिया संघाच्या अधिमंडळाच्या ४५ व्या ऑनलाईन वार्षिक सभेच्या अध्यक्षस्थानी वैभव पिचड होते. यावेळी संघाचे व्हाईस चेअरमन रावसाहेब वाकचौरे, संचालक गोरक्ष मालुंजकर, विठ्ठलराव डुंबरे, विठ्ठलराव चासकर, शरद चौधरी, भाऊपाटील नवले, सोपान मांडे, रामदास आंबरे, सुभाष बेणके प्रविण धुमाळ, रवींद्र हांडे, सौ. नंदाताई कचरे, सौ. रेखाताई नवले, प्रभारी कार्यकारी संचालक दादाभाऊ सावंत, शेटे, लेखापाल सत्यवान चौधरी उपस्थित होते.

यावेळी पिचड म्हणाले, कोविड काळात अमृतसागर दूध संघाने फक्त एकच दिवस दूध संकलन बंद ठेवून शेतकऱ्यांची गैरसोय होऊ दिली नाही. सर्वसामान्य गरजू, गरीब, अबालवृद्ध महिला, बालके यांच्यापर्यंत दूध पोहोचविले. तालुक्यात सुरू असलेल्या कोविड सेंटरलाही मदत केली. सद्यस्थितीत संघाचे दूध संकलन १ लाखावर पोहोचले असून, वर्षभरात सुमारे २ कोटी ७० लाख लिटर दूध संकलन तर दैनंदिन सरासरी ७४ हजार लिटर दूध संकलन होत आहे. दुधाचे दर ३५ ते ३६ रूपयांवर गेले होते. परंतु ते करोना काळात खाली आले. दुधावर अवलंबून असलेले व्यवसाय अडचणीत आल्याने त्याचे परिणाम स्वरूप दूध पुरवठा कोठे करायचा? हा मोठा प्रश्न निर्माण झाला. यातूनही आपण मार्ग काढला. संघाचा, शेतकऱ्याचा तोटा होणार नाही याची सांगड घालत संचालक मंडळाने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काम केले. गत दीड वर्षापासून संघाने इतरांपेक्षा प्रतिलिटर दुधाला १ रुपया जास्त भाव देऊन सुमारे २ कोटी ७० लाख रुपये शेतकऱ्यांना वाढीव दिले आहेत.

एनडीबी व डिपीटीसी यांच्या माध्यमातून ३५ बलकुलर संघाने घेतले. त्यामुळे दुधाचा नाश कमी झाला. मिल्कोटेस्टर दुरूस्तीची स्वतंत्र यंत्रणा उभारली. त्याच धर्तीवर बल्ककुलर दुरुस्तीची ही यंत्रणा उभी करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. शेतकऱ्यांना दर्जेदार सिमेन्स अल्पदरात संघाने स्वतःच्या निधी घालून उपलब्ध करून दिले आहे. संघाच्या पशुसंवर्धन विभाग हा ना-नफा ना तोटा या तत्वावर चालवित असून, त्यात काही त्रुटी जरूर असतील पण त्यात निश्चित सुधारणा होईल. पशुधन वाढले पाहिजे यासाठी संघ नेहमीच सर्वच आघाड्यांवर प्रयत्न करीत असतो. यंदाच्या वर्षाची दूध उत्पादकांची दिवाळी आपण निश्चितच गोड करणार आहोत. दिवाळी अगोदर दूध भाव फरक हा जास्तीत जास्त देऊ. कर्मचाऱ्यांना बोनस बरोबरच वेतन वाढ देखील देण्याचा विचार असल्याचे पिचड यांनी सांगितले.

सभेच्या प्रारंभी संघाचे प्रभारी कार्यकारी संचालक दादाभाऊ सावंत यांनी सभेच्या नोटीसचे तसेच गतवर्षीच्या सभेचे इतिवृत्त वाचन केले. संचालक विठ्ठलराव चासकर यांनी प्रास्तविक केले. तर या ऑनलाईन सभेत महेश नवले, राजेंद्र देशमुख, रामहरी तिकांडे, सुरेश नवले, प्रकाश देशमुख, संदिप भोर, गिरजाजी जाधव, सीताराम भांगरे आदींनी सहभाग नोंदवत संघाच्या चांगल्या कामाचे अभिनंदन करीत काही मौलिक सूचना केल्या व २ रुपये रिबेट द्यावा अशी मागणी केली. तसेच संघाचे चांगल्या कारभाराविषयी भूमिका मांडली. आभार संचालक भाऊपाटील नवले यांनी मानले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com