पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करुन शेतकर्‍यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी - पिचड

पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करुन शेतकर्‍यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी - पिचड
माजी आमदार वैभवराव पिचड

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले निळवंडे धरणांची पाणी पातळी कमी झाल्यामुळे राजूर सह अनेक गावांच्या पाणी योजना बंद पडल्या आहेत. तसेच उपसासिंचन योजना बंद पडल्यामुळे शेती पिकांचेही नुकसान झाले आहे. निळवंडे धरणांची पाणी पातळी 610 मीटर तलांक ठेवावी तसेच पाण्याअभावी झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करुन शेतकर्‍यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी माजी आमदार वैभवराव पिचड यांनी केली आहे .

निळवंडे धरणातील पाण्याची पातळी नेहमी किमान 610 मीटर असणे आवश्यक आहे. मात्र यंदा अधिक प्रमाणात पाणी सोडल्यामुळे निळवंंडे धरणाच्या पाण्याची पातळी 610 मीटर पेक्षा कमी झाली. त्यामुळे आदिवासी भागातील अनेक गावांतील उपसा जलसिंचन योजना बंद पडल्या आहेत, त्यामुळे पिण्याचा पाण्याचा प्रश्न तयार झाला असल्याने निळवंडे धरणातील पाण्याची पातळी वाढविणे गरजेचे आहे.

निळवंडे धरणाच्या पाण्याची पातळी कमी ठेवल्याने राजूर- केळुगंण- कोहंडी, पिंपरकणे-शेलविहीरे व पिंपळगांव नाकविंदा या तीन उपसा जलसिंचन योजना बंद पडलेल्या आहेत. त्यामुळे मोहोंडूळवाडी, माळेगांव, कातळापूर, कोदणी, रणद बु, लाडगांव, टिटवी, शेणित, मान्हेरे, अंबेवगंण या सर्व गांवाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. राजूर हे गाव 15 हजार पेक्षा जास्त लोकवस्तीचे आहे व इतर गावे हे 3 हजार पेक्षा जास्त लोकवस्तीचे आहेत. तरी शासनाने धरणाच्या पाण्याची 610 मीटर करावी अन्यथा येथील सर्व गावांना पिण्याच्या पाण्याचे टँकर जलसंपदा विभागाकडून उपलब्ध करुन देणे संदर्भात कार्यवाही करणे अत्यंत गरजेचे आहे.

तसेच राजूर- केळुगंण- कोहंडी, पिंपरकणे-शेलविहीरे व पिंपळगांव नाकविंदा या तीनही उपसा जलसिंचन योजनेचे पाणीपट्टीचे बील शेतकर्‍यांकडून वसुल केले जाते. मात्र पाण्याचे नियोजन न झाल्यामुळे शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे दिसून येते. पाण्याची 610 मीटर इतकी करुन शेतकर्‍यांचे व आदिवासी भागातील जनतेचे पिण्याच्या पाण्याचे प्रश्न तातडीने सोडविण्यात यावेत तसेच पाण्याअभावी झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करुन शेतकर्‍यांना जलसंपदा विभागाकडून नुकसान भरपाई देण्यात यावी. व आदिवासी भागातील जनतेला पिण्याचे पाणी त्वरीत उपलब्ध करुन देण्यात यावे, अशी मागणी श्री. पिचड यांनी जिल्हाधिकारी व कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग संगमनेर यांचे कडे केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com