स्वस्त धान्य प्रकरणी वाहतूक ठेकेदारावर चोरीचा गुन्हा दाखल करावा - पिचड

स्वस्त धान्य प्रकरणी वाहतूक ठेकेदारावर चोरीचा गुन्हा दाखल करावा - पिचड
माजी आमदार वैभवराव पिचड

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले तालुक्यातील बारी घाटात स्वस्त धान्य घेऊन चाललेल्या चार ट्रक संशयास्पद जात असताना सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने राजुर पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. याबाबत बुधवारी आपण रात्री उशीरा केलेल्या मागणी प्रमाणे कारवाई का झाली नाही? या घटनेतील मूळ शोधून दोषींना कडक शासन झाले पाहिजे. वाहतूक ठेकेदाराने खाजगी गाड्यात वाहतूक कशी केली? ठेकेदाराचा हेतू शुद्ध नाही त्यामुळे वाहतूक ठेकेदारावर गोडावून मधून धान्य चोरी करून नेल्याचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी माजी आमदार वैभवराव पिचड यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.

तालुक्यातील गोरगरीब जनतेच्या तोंडातील घास अर्थात रेशनिंगचे धान्य संशयास्पद घेऊन जात असताना बारी गावाजवळील घाटात चार गाड्या माजी आ. पिचड यांचे कार्यकर्ते व राजूर पोलिसांनी बुधवारी पकडुन राजूर पोलीस ठाण्यात आणण्यात आल्या होत्या. यावेळी पिचड यांनी स्वतः उपस्थित राहून चौकशी केली असता संबंधित गाडी चालक व पुरवठा विभागाचे कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देताना दिसून आले.

यानंतर पिचड यांनी रात्री तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन करून तात्काळ कारवाई करून गुन्हा दाखल करावा व संबंधित कर्मचार्‍यांची वैद्यकीय तपासणी करावी अन्यथा आपण कार्यालयातून उठणार नाही अशी ठोस भूमिका घेतल्याने तहसीलदार मुकेश कांबळे यांनी चौकशी, पंचनामा करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. मात्र घटनेला 24 तास उलटूनही कारवाई न झाल्याचे निदर्शनास आल्याने काल गुरूवारी दुपारी माजी आ. पिचड तहसील कार्यालयात येऊन तहसीलदारांना निवेदन देऊन तिव्र भावना व्यक्त केल्या.

यावेळी पिचड म्हणाले, जवळपास 500 क्विंटल धान्य हे तालुक्यातील गोरगरिबांचे हक्काचे धान्य आज पळवण्याचा प्रयत्न होत आहे. या प्रकरणाची व्याप्ती मोठी आहे. या प्रकरणात गोडावून किपर एकटा दोषी नसून त्यामागे मोठे षडयंत्र आहे. दोषी कर्मचार्‍यांवर कारवाई झाली पाहिजे. भाजपचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड. वसंतराव मनकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष राहुल देशमुख, भाजपचे शहराध्यक्ष सचिन शेटे, नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, उद्योजक राजेंद्र गोडसे, सुशांत वाकचौरे, राहुल शहा, स्वप्निल धुमाळ, राकेश देशमुख, नाजीम शेख, अनिल देशमुख, महेश माळवे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com