पिचड, भांगरे पारंपारिक विरोधक सामाजिक प्रश्नावर एकत्र!

पिचड, भांगरे पारंपारिक विरोधक सामाजिक प्रश्नावर एकत्र!

अकोले |प्रतिनिधी| Akole

पारंपरिक विरोधक व तीव्र राजकीय मतभेद असलेले भाजपचे नेते, माजी आमदार वैभव पिचड व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अशोकराव भांगरे आदिवासींच्या सामाजिक, धार्मिक प्रश्नावर एकत्र आल्याचे चित्र पहावयास मिळाले.

शुक्रवारी घोरपडा देवी मंदिरात एका व्यासपिठावर आले असता कार्यक्रमापूर्वी एकमेकांच्या प्रकृतीची चौकशी करून कार्यक्रम संपल्यानंतर दोन्ही नेते मंदिरात एकत्र येत सध्या बिरसा ब्रिगेडच्या माध्यमातून आदिवासी समाजामध्ये फूट पाडून गैरसमज पसरविण्याचे काम होत असून दशक्रियविधी करायचे नाही, देव देवता मान्य नाही, अखंड हरिनाम सप्ताह करायचा नाही असे अनेक मुद्द्यांवर आदिवासी समाजाला संभ्रमात पाडून धार्मिक आध्यात्मिक प्रश्नावर तसेच आदिवासी हक्काच्या प्रश्नावरून लक्ष विचलित केले जात असल्याने माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी या प्रश्नावर कडाडून टीका केली असून आदिवासी समाजाने कोणत्याही अपप्रचाराला बळी न पडता योग्य पद्धतीने काम करण्याचे आवाहन केले.

व समाजाने पक्षभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याचे आवाहन केले होते. तालुक्यात व राज्यात आदिवासी विकास परिषदेच्या माध्यमातून आदिवासी समाजाला बिरसा ब्रिगेड करत असलेल्या कामाबद्दल कल्पना देऊन सामाजिक व धार्मिक आध्यात्मिक बाबत मार्गदर्शन केले.त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी सकाळी रंधा येथे घोरपड देवीचे पुजारी मुरलीधर येडे यांच्या दशक्रियाविधी निमित्त अशोकराव भांगरे व वैभवराव पिचड उपस्थित होते.

याप्रसंगी भांगरे- पिचड यांनी आदिवासींच्या प्रश्नांवर एकत्र येण्याचे ठरविले असून लवकरच सामाजिक प्रश्नावर राज्य, जिल्हा, तालुका पातळीवर मेळाव्याचे आयोजन करून आदिवासी समाजाला योग्य दिशा देण्याचे काम केले जाणार आहे.

याबाबत माजी आमदार वैभव पिचड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सामाजिक प्रश्नांबाबत आमचे एकमत असून राजकीय पक्षाचे काम करत असताना सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे. समाजाच्या हितासाठी माजी मंत्री पिचड यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देऊन आदिवासी समाजाला न्याय मिळवून दिला आहे. आजही या वयात ते काम करत आहेत. अशोकराव भांगरे आमच्या मताशी सहमत आहेत याचा आनंदच आहे.

अशोकराव भांगरे यांनी दुजोरा देत आदिवासी समाज हा पिढ्यानपिढ्या देव धर्म पारंपारिक चालीरीती जोपासत आला आहे. वर्षानुवर्षे तो महादेवाला मानतो तसेच प्रत्येक आदिवासी गावात मारुती, श्री विठ्ठल मंदिर असून या माध्यमातून अखंड हरिनाम सप्ताह बसविला जाऊन त्यातून अध्यात्मिक संस्कार जोपासला जातो त्या परंपरेला कुणी छेद देत असेल तर मान्य होणार नाही. आदिवासींच्या प्रश्नावर भांगरे- पिचड एकत्र आले असून आमदार डॉ. किरण लहामटे व शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर तळपाडे यांच्या भूमिकेकडे तालुक्याचे लक्ष आहे. तर ही सहमती राजकीय नसेल ना? असाही प्रश्न उपस्थित आहे. आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या एकांगी भूमिकेमुळे भांगरे नाराज असून येणार्‍या निवडणुकीतही त्यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे.

राजकारणात आमचे जे नुकसान व्हायचे ते झाले मात्र आदिवासींच्या प्रश्नावर माजी मंत्री मधुकर पिचड यांनी घेतलेली भूमिका योग्य असून या पुढील काळात आदिवासी समाजात फूट पडणार्‍या, गैरसमज पसरवला जातो अशा बिरसा ब्रिगेड संघटनेला आपला विरोध आहे. आदिवासी समाजाच्या हितासाठी आपण निश्चित राजकीय जोडे बाजूला सारुन एकत्र येऊन काम करु.

- मधुकर तळपाडे, जिल्हा उपाध्यक्ष, शिवसेना

अकोले तालुक्यातील आदिवासी भागात काम करणारे कीर्तनकार, प्रवचनकार यांनीही याबाबत भूमिका घेऊन लवकरच रतनवाडी येथे निवृत्ती इंदुरीकर महाराज यांच्या उपस्थितीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

- देवराम ईदे महाराज

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com