संगमनेर |प्रतिनिधी| Sangmner

तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाची समजल्या जाणार्या वडगावपान ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत थोरात साखर कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ यांच्या नेतृत्वाखाली

शेतकरी विकास मंडळाचे बहुमत असतांना देखील त्यांच्या होमस्पीचवर अपक्षांनी मोठ बांधत अपक्ष उमेदवार श्रीनाथ कोंडाजी थोरात यांची सरपंच पदी निवड करत आश्चर्याचा धक्का दिला आहे.

राजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण समजल्या जाणार्या वडगाव पान ग्रामपंचायत मध्ये शेतकरी विकास मंडळाच्या 7 तर अपक्षांच्या 6 जागा निवडून आल्या होत्या. त्यामुळे शेतकरी विकास मंडळाचा सरपंच होणार हे सहाजिकच होते परंतु रात्रीतून अपक्षांनी आपली मोठ बांधली. सरपंच निवडीच्या दिवशी गुप्त मतदान झाले.

सरपंच पदासाठी शेतकरी विकास मंडळाकडून वनिता निलेश थोरात तर अपक्षांकडून श्रीनाथ कोंडाजी थोरात यांनी सरपंचपदासाठी अर्ज दाखल केले होते. झालेल्या मतदानात प्रक्रियेत अपक्ष श्रीनाथ थोरात यांना 7 मते मिळाली तर विरोधी शेतकरी विकास मंडळाच्या वनिता निलेश थोरात यांना 6 मते मिळाली. सरपंचपदी अपक्ष उमेदवार श्रीनाथ थोरात यांची निवड झाली. तसेच उपसरपंचपदी शेतकरी विकास मंडळाचे सोमनाथ गायकवाड यांना 7 मते मिळाली तर विरोधी गटाचे अपक्ष उमेदवार अनिल गोविंद थोरात यांना 6 मते मिळाली.

त्यामुळे उपसरपंच पदी शेतकरी विकास मंडळाचे सोमनाथ गायकवाड यांची निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब जाधव यांनी केली. त्यांना सहायक म्हणून निवडणूक निर्णय अधिकारी तथा ग्रामविकास अधिकारी विजय केदारी आणि कामगार तलाठी अनिता सातपुते यांनी काम पाहिले.

नूतन सरपंचपदी श्रीनाथ थोरात यांना विराजमान करण्यासाठी माजी सरपंच संतोष काशीद, पुंजाहारी मारुती थोरात, अशोक गायकवाड, कैलास गायकवाड, विश्वनाथ थोरात, भाऊसाहेब थोरात, दत्तात्रय थोरात, विलास थोरात, अशोक थोरात, अमित थोरात, सुधाकर काशीद, सुमित काशीद यांनी आटोकाट प्रयत्न केले आणि त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले. सरपंच पदी श्रीनाथ थोरात यांची निवड झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी ‘सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार’ अशा घोषणा देत मुक्त भंडार्याची उधळण करत जल्लोष साजरा केला.

आमचे आजोबा रघुनाथ नाना पाटील थोरात हे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचे कट्टर समर्थक होते. त्यांच्या विचारांचा पगडा माझ्यावर देखील राहिला. वडगावपानच्या विकासासाठी आपण आजोबा रघुनाथ नाना थोरात व सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात, ना. बाळासाहेब थोरात यांचे विचार घेवून कार्यरत राहु. माझा विजय हा गावातील सर्व तरुण व ग्रामस्थांचा आहे. आगामी काळात विकासाची प्रक्रिया राबवितांना महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली सर्व ग्रामस्थांना व पदाधिकार्यांना सोबत घेवून गावचा विकास साधण्यासाठी प्रयत्नशील राहु, अशी ग्वाही नूतन सरपंच श्रीनाथ थोरात यांनी दिली.