संगमनेर |प्रतिनिधी| Sangmner

राजकीय दृष्ट्या अत्यंत प्रतिष्ठेच्या असलेल्या वडगाव पान येथे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात समर्थकांत चांगलीच जुंपल्याने गावसत्ता हा विषय चर्चेचा ठरला आहे.

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीनंतर हा वाद उफाळला आहे. सदस्यांची पळवापळवी, बैठकीतील कोंडी, आरोप-प्रत्यारोप यामुळे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात समर्थकांचे गाव मानले जाणाऱ्या वडगाव पान येथील राजकारण पेटले आहे.

थोरात कारखाना अध्यक्ष बाबासाहेब ओहळ यांच्या समर्थक कार्यकर्त्यांच्या शेतकरी ग्रामविकास मंडळाने सरपंचांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली तर सरपंच श्रीनाथ थोरात यांनी ओहळ यांनीच कारखाना अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा असे म्हटले आहे.

सरपंचांनी राजीनामा द्यावा - शेतकरी ग्रामविकास मंडळ

राजकीय दृष्ट्या अत्यंत प्रतिष्ठेच्या असलेल्या वडगाव पान येथील ग्रामपंचायतीमध्ये शेतकरी ग्रामविकास मंडळाच्या अंतर्गत निवडून आलेल्या

सदस्यांपैकी एक सदस्य पळवून विरोधी गटाने सरपंच पदावर दावा केला असला तरी पहिल्याच झालेल्या बैठकीत कोरम पूर्ण झाला नसल्याने सरपंचावर बहुमता अभावी बैठक रद्द करण्याची नामुष्की ओढवली आहे. मात्र उपसरपंच सोमनाथ गायकवाड यांनी उपसरपंच पदाचा पदभार स्विकारला आहे.

महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे व इंद्रजीत भाऊ थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी ग्रामविकास मंडळाने निवडणूक लढवत कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ, माजी उपसभापती बाळासाहेब गायकवाड, पंचायत समिती सदस्य बेबीताई थोरात यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास मंडळाने ग्रामपंचायत निवडणूक लढविली. यामध्ये जनतेने शेतकरी ग्रामविकास मंडळाला मोठे यशही मिळवून दिले. या निवडणुकीत अरुण कुळधरण, गणेश गडगे, वंदना थोरात, माया गायकवाड, सोनाली गडगे, मनिषा थोरात, सोमनाथ गायकवाड हे सदस्य विजयी झाले.

यापैकी विरोधी गटाने अचानक एक मत पळवून सरपंच पदावर दावा ठोकला. मात्र पहिल्याच मासिक बैठकीमध्ये बहुमताअभावी बैठक रद्द करण्याची नामुष्की ओढवली. त्यामुळे नैतिकतेचा आधार घेऊन सरपंच आणि ताबडतोब राजीनामा द्यावा अशी मागणी युवक काँग्रेसचे अध्यक्ष निलेश थोरात, संभाजी थोरात, नजिरभाई तांबोळी, आबासाहेब थोरात, सुधीर थोरात, गणेश थोरात, बाळासाहेब गडगे, बाबा गडगे, साहेबराव गडगे आदींनी केली आहे.

काल शेतकरी ग्रामविकास मंडळाचे सर्व विजयी उमेदवार ग्रामपंचायत ठिकाणी एकत्र आले. त्यांच्या उपस्थितीत उपसरपंच सोमनाथ गायकवाड यांनी पदभार स्विकारला. यावेळी बेबीताई थोरात, महेश मोरे, डॉ. दादाभाऊ थोरात, एन. टी. थोरात, संभाजी काशिद, डि. के. कुळधरण, दत्तु शंकर थोरात, बजु तात्या थोरात, तात्या कुळधरण, बाबुराव थोरात, गजानन गडगे, अशोक थोरात उपस्थित होते.

यावेळी बोलतांना कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ म्हणाले, शेतकरी ग्रामविकास मंडळ बहुमताने निवडून आले आहे. काही कारणास्तव सरपंच पदाच्या निवडीमध्ये चुकीच्या पद्धतीने मतदान त्या ठिकाणी झाले. परंतु समाजाला दाखविण्यासाठी आजही सातही सदस्य एकत्रितरित्या उपसरपंच सोमनाथ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे. त्यांना अजूनही इतर सदस्यांचा पाठिंबा आहे.

शेतकरी ग्रामविकास मंडळाचे सदस्य ना. थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहे. जर कुणी या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने कारभार करण्याचा प्रयत्न केला तर बहुमताच्या जोरावर या ठिकाणी चुकीचा कारभार झाला नाही पाहिजे, अशी दक्षता घ्यायची आहे.

कुणावरही अन्याय होणार नाही, या परिसरामध्ये गरीब, शोषित, दलित असा कुठलाही प्रकार होता कामा नये, चुकीच्या पद्धतीने जर कुणी स्वतःचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करत असेल तर तोही प्रयत्न गाव बांधिलकी म्हणून या सर्व सदस्यांनी हानून पाडायचा आहे.

पराभव स्वीकारुन ओहोळांनी चेअरमनपदाचा राजीनामा द्यावा - थोरात

वडगावपान ग्रामपंचायत निवडणूक लढवित असतांना ना. बाळासाहेब थोरात यांच्या आशिर्वादानेच निवडणूकीला सामोरे गेलो. आणि विजयी देखील झालो, आता बैठकीवेळी कोरम पूर्ण झाला की नाही हा संविधानाचा विषय आहे, कोरम जरी पूर्ण झाला नाही तरी विकासाला खिळ बसत नाही, जे उमेदवार जनतेने निवडून दिले आहेत.

ते जनतेच्या सेवेसाठी निवडून दिले आहे. ते कोणा एका व्यक्तीचे नव्हे, त्यामुळे आम्ही जनतेच्या सेवेसाठी कटीबद्ध आहोत, आमचा जरी कोरम पूर्ण होत नसला तरी घटनेने आम्हाला सर्व अधिकार दिले आहे.

राहिला राजीनाम्याचा प्रश्न तर त्यावर संगमनेर भाग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाबासाहेब ओहोळ यांनी त्यांच्या उमेदवारांना निवडणूकीपूर्वी जो शब्द दिला होता. तो त्यांनी पहिला पाळावा, शेतकरी ग्राम विकास मंडळाचे उमेदवार जर पराभूत झाले तर मी चेअरमन पदाचा राजीनामा देईल, असा शब्द ओहोळ यांनी त्यांच्या सर्व उमेदवारांना दिला होता. तरी पण त्यांचे सहा उमेदवार पडले.

लढत फक्त 13 पैकी 9 जागांवर झाली. उरलेल्या 4 जागांमध्ये एक जागा अपक्ष गटाने सोडून दिली. तर राहिलेल्या तीन जागा ज्या निवडणूकीपूर्वी बिनविरोध झाल्या त्या पैकी 2 या मागील पंचवार्षिकाला आमचे उमेदवार होते. आणि आज ते बिनविरोध झाल्यानंतर चेअरमन यांनी दडपशाही करुन त्या दोघांवर दावा ठोकला. ही वस्तुस्थिती असून ते दोन पूर्वीपासून आमचेच आहेत. आणि यापूढेही आमचेच राहणार.

तर आता प्रश्न राहिला सरपंच पदाच्या राजीनाम्याचा? यावर नूतन सरपंच श्रीनाथ थोरात म्हणाले, निवडणूक जाहीर झाल्यानंतर शेतकरी मंडळाला उमेदवार मिळत नव्हते. जे उमेदवार भेटले. ज्या उमेदवारांना उभे केले गेले.

त्यांना चेअरमन यांनी ‘तुम्ही जर पडला तर मी कारखान्याच्या चेअरमनपदाचा राजीनामा देईल, आज त्यांनी त्यांच्या मंडळाचे सहा उमेदवार पराभूत झाल्याने याची नैतिक जबाबदारी स्वीकारुन चेअरमन पदाचा राजीनामा द्यावा, तो दिल्यानंतर त्यांनी किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने वडगावपानच्या कुठल्याही वार्डात ग्रामपंचायतसाठी उभे राहावे, आणि निवडून येवून दाखवावे, त्यानंतर आम्ही सर्वच राजीनामे देवू, असे खणखणीत प्रतित्त्युर नूतन सरपंच श्रीनाथ थोरात यांनी प्रतिनिधीशी बोलतांना दिले आहे.